
ज्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांच्याबरोबर राज्यकारभार करणे ही जनतेशी केलेली प्रतारणा आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर या लोकांबरोबर बसणार नाही. हरामाच्या पैशांनी निर्माण केलेले साम्राज्य हे जास्त दिवस टिकत नाहीत, त्यामुळे या पापात आपण सहभागी होणार नाही, असा घणाघात वनमंत्री गणेश नाईक यांनी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाचे अक्षरशः वाभाडे काढले. गेल्या पाच वर्षांत नवी मुंबई शहराची पूर्णपणे वाट लावली आहे. या शहरात सामाजिक उपक्रमांसाठी आणि सेवासुविधांसाठी असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यात आले आहेत. त्यातून अफाट माया गोळा करण्यात आली आहे. मात्र हा भ्रष्टाचार करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की हरामाच्या पैशांनी निर्माण केलेले साम्राज्य हे तुटून पडते. हरामाच्या पैशांनी मोठ्या झालेल्या आणि गोरगरीबांचे स्वप्न तोडलेल्या लोकांना सुख कधीच मिळणार नाही. क्षणिक सुखासाठी आणि आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्याच्या जीवनात आग लावण्याचा धंदा करणारे कधीच सुखी होणार नाही, जनता त्यांना कधीच माफ करणार नाही हे लवकर दिसेल, असेही फटकारे गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावले.
उन्माद मोडून काढणार
मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो. त्यावेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी माझ्याच विचारांच्या पक्षाची सत्ता होती. मात्र मला सत्तेचा उन्माद कधीच आला नाही. ज्यांना सत्तेचा उन्माद आला आहे, त्यांची गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यात दादागिरी सुरू आहे. मात्र त्यांचा उन्माद मोडून काढण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही गणेश नाईक यांनी यावेळी दिला.
30 हजार रुपये चौरस मीटर अंडरटेबल
नवी मुंबई शहरात गेल्या पाच वर्षांत बांधकाम व्यावसायिकांची मोठी छळवणूक झाली आहे. सिडकोने बेसुमार भूखंडांची विक्री केली. टेंडरमध्ये मिळालेले भूखंड घेण्यासाठी थेट नगरविकास विभागाच्या प्रमुखांना भेटण्यास सांगण्यात आले आहे. तिथे 30 हजार रुपये अंडरटेबल मोजल्यानंतर टेंडरमधील भूखंड या बिल्डरांना देण्यात आला. मात्र यांच्या दादागिरीमुळे तक्रार करण्यासाठी एकही बिल्डर पुढे येत नाही, असा गौप्यस्फोट गणेश नाईक यांनी यावेळी केला.





























































