
स्वस्तिकाच्या आकाराची किंवा बाप्पाच्या मूर्तीच्या आकाराची विद्युत माळ, जास्वंदाच्या पानांचा आकार असलेली विद्युत माळ, विविध फुलांच्या आकाराच्या तसेच मल्टी कलरसह आकर्षक रंगीत छोट्या दिव्यांपासून तयार करण्यात आलेल्या विद्युत माळा, लाल-हिरवा-निळ्या रंगाचे छोट्या ते मोठ्या आकाराचे फोकस गणेशभक्तांचे डोळे दिपवून टाकत आहेत. विद्युत माळांबरोबरच घरगुती सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या फोमशीट आणि लाकडी बनावटीच्या मखरांना गणेशभक्तांची विशेष पसंती मिळत आहे.
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांच्या बोहरी आळी, रविवार पेठेत झुंबडी उडू लागल्या असून, विद्युत माळांच्या खरेदीसाठी पासोड्या विठोबा मंदिर परिसरात गदीं होत आहे.
सध्या बाजारात 150 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंतच्या विद्युत माळा उपलब्ध आहेत. यामध्ये जास्वंदाच्या झाडाच्या पानाचा आकार असलेल्या हिरव्या माळेला ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. स्वस्तिकाच्या आकाराची माळ ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, स्वस्तिकाच्या आकाराची माळ पिवळ्या रंगाचे दिवे आणि मिल्की कलर अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, विविध छोट्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करून तयार केलेली विद्युत माळ गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहे. लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाच्या दिव्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले छोटे-मोठे फोकस गणेशभक्त खरेदी करताना दिसत आहेत, अशी माहिती नवनाथ इलेक्ट्रॉनिक्सचे अक्षय जगताप यांनी सांगितले.
छोटे झुंबर, फॉग लाईटला विशेष मागणी
दरवर्षी नवनवीन सजावटीचे साहित्य बाजारात दाखल होत असते. लाडक्या बाप्पाच्या डोक्यावर लावण्यासाठी खास छोट्या, मोठ्या आकाराचे झुंबर विक्रीसाठी दाखल झाले आहे. ठरावीक वेळेनंतर या झुंबरामधील दिव्यांचा रंग सतत बदलत राहतो, हे या झुंबराचे खास वैशिष्ट्य असल्याने गणेशभक्तांची या झुंबरांना खास पसंती। मिळत असून, हे झुंबर 400 ते 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच, लग्न समारंभ, वाढदिवसांमध्ये सजावट करताना फॉग लाईटला विशेष महत्त्व दिले जाते. आता गणेशोत्सवात घरगुती सजावटीतदेखील छोट्या आकाराच्या फॉग लाईट खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असेही जगताप यांनी सांगितले.
मेड इन इंडिया माळांना मागणी
बाजारामध्ये सध्या हिंदुस्थानी माळांबरोबर चायनीज माळादेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चिनी माळांची किंमत कमी असली तरी त्या माळा टिकाऊ नसतात. त्यामुळे टिकाऊपणा चांगला असल्याने ग्राहकांची हिंदुस्थानी बनावटीच्या माळांना पसंती मिळत आहे, असे जगताप म्हणाले.
एलईडी बोर्ड ठरतोय आकर्षण
पूर्वी सजावटीच्या वेळी बाप्पाच्या डोक्याच्या मागे फिरते कागदी चक्र लावण्याची परंपरा होती. या कागदी चक्राची जागा आता आधुनिक एलईडी चक्राने घेतली आहे. हा बोर्ड बाप्पाच्या डोक्यामागे अगदी सहजपणे बसवता येत असून, यामध्ये चक्र, स्वस्तिक, श्री असे धार्मिक चिन्ह सतत बदलत राहते. त्यामुळे अशा एलईडी | बोर्डाला खास पसंती मिळत आहे.