गणपतीसाठी भजनी मंडळांना 25 हजार, राज्यातील 1800 मंडळांना होणार लाभ

गणेशोत्सव आणि भजन यांचा जवळचा संबंध आहे. गणपतीच्या काळात विशेषकरून कोकणामध्ये घरोघरी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील भजनी मंडळांनाही भजन साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील 1800 भजन मंडळांना त्याचा लाभ होणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी यासंदर्भात माहिती दिली. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आल्याने राज्यात गणपतीच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भजनी मंडळांनी सरकारी अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेलार यांनी केले. अनुदानासाठी भजनी मंडळांना अर्ज करावे लागणार असून ते 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्या! समन्वय समितीची मागणी

राज्य शासनाने राज्य महोत्सवाअंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्यावे, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. याबाबत राज्य शासनाला समन्वय समितीकडून पत्र देण्यात आल्याचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचे विस्तृत नियोजन करावे लागते. सामाजिक जागृती आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. यासाठी मोठा खर्चही येतो. त्यामुळे अनुदान द्यावे, अशी मागणी दहिबावकर यांनी केली.