Ganeshotsav 2025 – जड वाहनांना लागणार ब्रेक! या तारखांना ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत No Entry

गणरायाच्या आगमनाचे सर्वांना वेध लागले आहेत. 27 ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांसह प्रशासनाने सुद्धा आता कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. गणेशोत्सव काळात लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे वाहतुककोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव काळातील काही दिवशी जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

गणपती विसर्जनाच्या काळात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांचा अलोट सागर बाहेर पडतो. अशा परिस्थितीत वाहतुककोंडीची समस्या निर्माण होते. 27 तारखेला गणपती बाप्पाच आगमन झाल्यानंतर दीड दिवसांच्या, पाच दिवसांच्या, सात दिवसांच्या आणि दहा दिवसांच्या गणपतींचे टप्याटप्याने विसर्जन होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून 28 आणि 31 ऑगस्ट व 2, 5 आणि 6 सप्टेंबर या दिवशी ठाणे आयुक्तालय हद्दीत जड वाहनांना 100 टक्के प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे आयुक्तालय हद्दीत प्रामुख्याने घोडबंदर रोड, नाशिक-मुंबई, पनवेल-मुंब्रा, मुंब्रा-नाशिक, कल्याण-भिवंडी या मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंदी असेल.