गणेशोत्सवात विसर्जन मार्ग, कृत्रिम तलावाशेजारी विद्युत रोषणाई; भाविकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी 19 सर्च लाईट

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार असून बेस्ट उपक्रमाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लाईफगार्डच्या मदतीसाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी 19 उच्च क्षमतेचे सर्च लाईट लावण्यात येणार आहेत तर विसर्जन मार्ग आणि 39 कृत्रिम तलावांशेजारी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

बेस्टच्या विद्युत विभागाने मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर आणि विसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाकडून मुंबईत गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी 71 मिरवणूक मार्ग, 20 विसर्जनस्थळे आणि 39 कृत्रिम तलावांजवळ 2 हजार 296 दिवे लावण्यात येणार आहेत. विसर्जनस्थळांवर सुयोग्य प्रकाश व्यवस्थेसाठी एकूण 15 स्थायी विद्युत मनोऱयांची उभारणी करण्यात येत आहे तसेच मोठय़ा गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विसर्जनस्थळांवर पर्यायी वीज पुरवठय़ासाठी 8 डिझेल जनित्र संचाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विसर्जनस्थळी वीजपुरवठा सुरळीत आणि अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

नियम, अटी, वाहतूक व्यवस्थेसाठी पुस्तिका
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवात विद्युत रोषणाईसाठी गणेशोत्सव मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा मिळण्यासाठी अर्जदारांनी पूर्ण करायच्या नियम आणि अटींच्या सर्व सूचना तसेच मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळी प्रकाश योजनेची माहिती आणि गणेशभक्तांसाठी बस वाहतूक व्यवस्थेबाबत संपूर्ण माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. ही पुस्तिका बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर (www.bestundertaking.com) उपलब्ध आहे.