
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे ‘प्लॅनिंग’ केलेल्या चाकरमान्यांची ट्रेनच्या बुकिंगमध्ये निराशा झाली आहे. सोमवारपासून आरक्षणाची सुरुवात झाली. मात्र मागील तीन दिवसांत नियमित रेल्वे गाडय़ांचे बुकिंग अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाले. त्यामुळे हजारो चाकरमान्यांना आता गणपती स्पेशल जादा रेल्वे गाडय़ांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एका मिनिटात बुकिंग फुल्ल कसे झाले, असा सवाल करीत चाकरमान्यांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे.
गणपतीला गावी जाण्यासाठी सोमवारपासून नियमित गाडय़ांच्या बुकिंगसाठी चाकरमान्यांनी तिकीट खिडकीवर गर्दी केली. मात्र 22, 23 आणि 24 ऑगस्टचे आरक्षण सुरू होताच रिग्रेट म्हणजे सर्व गाड्यांचे आरक्षण एका मिनिटाच्या आत फुल्ल झाल्याचा मेसेज आला. यापूर्वी 800 ते 1000 पर्यंत प्रतीक्षा यादीतील तिकिटे वितरित केली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रतिक्षा यादीतील तिकिटांच्या विक्रीला 25 टक्क्यांची मर्यादा आखून दिली आहे. त्या उपायानंतरही चाकरमान्यांची कुचंबणा कायम आहे. गणपती स्पेशल जादा गाडय़ांचे कन्फर्म तिकीट मिळेल की नाही याबाबत चाकरमानी साशंक आहेत. रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत गोंधळ कायम असल्याने खासगी ट्रव्हल्सचे फावणार आहे.
तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा संशय
गणेशोत्सव काळातील आरक्षणात दरवर्षी चाकरमान्यांचा हिरमोड होतो. त्या पार्श्वभूमीवर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी केला आणि आवाज उठवला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तिकीट दलालांवर कारवाई केल्याचा दावा केला. मात्र त्यानंतरही बुकिंग काही मिनिटांत फुल्ल होण्याचे सत्र सुरु राहिलेले आहे. हे रेल्वे प्रशासनाचे अपयश आहे, असा दावा रेल्वे प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी केला. प्रवाशांना होणाऱया मनस्तापाला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ठाण्यातील प्रवासी हर्षद शेरे यांनी केला.