सहा महिन्यांतच Gary kirsten यांनी पाकिस्तान संघाची साथ सोडली

पाकिस्तान संघाचा खेळ मागील काही महिन्यांपासून अगदीच सुमार राहिला आहे. त्यामुळे बाबर आझम, शाहीन आफ्रिदीसह मुख्य खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघातून डच्चू देण्यात आला होता. अशातच रविवारी मोहम्मद रिजवान याची व्हाईट बॉल क्रिकेटसाठी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. एकीकडे कर्णधार म्हणून रिजवानच्या हाती संघाची धुरा सोपवली, तर दुसरीकडे संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

एप्रिल 2024 साली पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) गॅरी कर्स्टन यांची वन डे आणि टी-20 संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर दोन वर्षांसाठी नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी फक्त सहा महिन्यांमध्येच आपला घाशा गुंडाळून पीसीबीच्या हाती राजीनामा सोपावला आहे. दरम्यानच्या काळात पीसीबीने गॅरी कर्स्टन यांचे संघ निवडीचे अधिकार काढून घेतले होते. तसेच मोहम्मद रिझवान यांची वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधार पदावर नियुक्ती करताना सुद्धा गॅरी कर्स्टन यांचे मत विचारात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांची नाराजी उघड होती. तसेच निवड समीतीचा संघात वाढता हस्तक्षेप सुद्धा त्यांच्या पचणी पडत नव्हता.

गॅरी कर्स्टन यांनी लेखी राजीनामा पीसीबीला दिला आहे. तसेच पीसीबीने ट्वीट करत संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक असणारे ऑस्ट्रेलियाचे जेसन गिलेस्पी यांच्यावर वनडे आणि टी-20 संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. गॅरी कर्स्टन यांच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या काळात हिंदुस्थानने तब्बल 27 वर्षांनी 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.