देशातील गॅसच्या टंचाईमुळे मोंदीनी शोधून काढलेल्या नाल्यातून गॅस निर्मितीचे तंत्र वापरूया, संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिठी नदीवर नाल्यातून गॅस तयार करण्याचा प्रकल्प राबवावा आणि पंतप्रधान मोदींना उद्घाटनासाठी बोलवा, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच देशातील गॅसच्या टंचाईमुळे मोंदीनी शोधून काढलेल्या नाल्यातून गॅस निर्मितीचे तंत्र वापरूया असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की सध्या देशासमोर सर्वात मोठा विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती. व्यावसायिक गॅस, घरगुती गॅस आणि इंधन यांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे. जेव्हा हे युद्ध सुरू झाले तेव्हा मोदी सरकारतर्फे सांगण्यात आले होते की या युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही, भारतीय जनतेवर होणार नाही आणि महागाई वाढणार नाही. देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी जनतेला दिलेले हे आश्वासन आता पूर्णपणे फेल गेले आहे.

मुंबईसारख्या शहरामध्ये तसेच इतर शहरांमध्ये सुमारे 30 टक्के रेस्टॉरंट्स बंद पडली आहेत, कारण गॅस उपलब्ध नाही. दिल्लीमध्येही तीच परिस्थिती आहे आणि बेंगळुरूमध्येही तीच परिस्थिती आहे. गॅस नसल्यामुळे वाहन उद्योगावर फार मोठे संकट आले आहे. गुजरातमधील मोरबी येथे टाईल्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. सुमारे तीन लाख कामगार त्या उद्योगावर अवलंबून आहेत. पण गॅस टंचाईमुळे मोरबीतील टाईल्स उद्योग पूर्णपणे बंद पडला आहे.

महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात इंजिनिअरिंग आणि फाउंड्रीचे अनेक प्रकल्प आणि प्लांट्स आहेत. त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात गॅसची गरज असते आणि त्यामुळे ते उद्योगही पूर्णपणे संकटात आले आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि चाकणमधील वाहन उद्योगही संकटात आला आहे. पण त्याबाबत नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक काहीच बोलत नाहीत. गॅस आणणार कुठून आणि इंधन आणणार कुठून, हा आमचा प्रश्न आहे.

त्यामुळे आम्ही असे ठरवत आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येते. नाल्यात पाइप टाकायचा आणि त्यातील गॅसच्या मदतीने आपल्या घरातील चुली पेटवता येतात. त्यांचा हा शोध आता आम्हाला आठवला आहे. मुंबईत मिठी नदी आहे. त्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्धता, गटार आणि नाले मिसळलेले आहेत. त्यामुळे मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रकल्प नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का, असा आमचा विचार आहे. त्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींना बोलवावे. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरात असे अनेक उद्योग निर्माण होतील आणि आखाती युद्धामुळे जी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे ती मोदींच्या कृपेने दूर करता येईल.

पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. त्यासाठी किती पाइप लागणार आहेत, काय लागणार आहे, याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दिल्लीतील यमुना नदीही आता नाल्यासारखी झाली आहे. तिथेही असा एखादा प्रकल्प उभारता येईल.

मोदींचे जे स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करायची, ते जर आखाती युद्धामुळे पूर्ण होत असेल तर महाराष्ट्र त्या संदर्भात पाऊल टाकायला तयार आहे. लहान उद्योगांना यासाठी जर अनुदान लागणार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी ते तात्काळ मंजूर करावे. मोठा प्रकल्प असेल तर मिठी नदीवरील प्रकल्पासाठी पंतप्रधानांना आम्ही आमंत्रित करू.

परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. या संकटाचा फटका शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना बसणार आहे. हॉटेल उद्योग, मोटार उद्योग, टाईल्स उद्योग आणि इतर उद्योगांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मोदींनी केलेले नाल्यातून गॅस निर्मितीचे संशोधन वाया जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

मोदींचे जे स्वप्न आहे भारताला शंभर वर्ष मागे नेण्याचे, ते आता पूर्ण होत आहे. मोदी किंवा त्यांच्या सरकारने ज्या प्रकारचे राज्य येथे चालवले आहे, त्यामुळे गाड्या जाऊन बैलगाड्या येतील अशी परिस्थिती निर्माण होईल. “हमारा संस्कार, हमारी संस्कृति” असे ते म्हणतात. पण त्यांची संस्कृती आणि संस्कार हे विज्ञान नष्ट करण्याचे आणि नाल्यातून गॅस निर्माण करण्यासारखे विचार मांडण्याचे आहेत.

देशावर संकट आहे आणि आम्ही नाल्यातून गॅस निर्मिती करायला तयार आहोत. उद्घाटनाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावे. मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे नाल्यातून गॅस निर्मिती होऊ शकते, ती ठिकाणे आम्ही त्यांना दाखवायला तयार आहोत.

काल अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी एक विधान केले. त्या म्हणाल्या की आम्ही भारत सरकारला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे आणि भारत हा एक चांगला अॅक्टर आहे. आम्ही सांगतो ते ते ऐकतात आणि करतात. जर हे खरे असेल तर हा देशाचा सर्वात मोठा अपमान आहे. याचा अर्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार अमेरिकेचे कठपुतळी बनले आहे.

हा सगळा व्यापार आणि ट्रेडचा कायदा शेवटी मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी होणार आहे. एखादा भारतीय उद्योग अमेरिकेत जात असेल तर प्रश्न असा आहे की भारतातील उद्योग परदेशात का जात आहेत. जी गुंतवणूक भारतात व्हायला हवी, जी गुंतवणूक महाराष्ट्रात व्हायला हवी, ती येथे का होत नाही. भारतातील मोठ्या उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करावी असे का वाटत नाही, ही मोठी शोकांतिका आहे असेही संजय राऊत म्हणाले.

गॅसच्या टंचाईमुळे रेल्वेतही खाद्यपदार्थ देण्यात अडचणी येत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, आता रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जिथे जिथे नाले आणि गटारे आहेत तिथूनही गॅस तयार करावा लागेल. मोदीजींची इच्छा अशी आहे की जर गॅस संपला तर रेल्वे जिथे नाला किंवा गटार आहे तिथे थांबवावी. मग पॅन्ट्रीमधील कर्मचारी खाली उतरतील, त्या नाल्यातून गॅस घेऊन परत रेल्वेत येतील आणि त्यावर स्वयंपाक करतील. हे मोदीजींचे मोठे संशोधन आहे. या संशोधनासाठी त्यांना विज्ञानातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा. आणि इराण-इस्रायल युद्धाचे आभार मानायला हवेत, कारण त्यांच्या युद्धामुळे इतके मोठे संशोधन समोर आले आहे.