विधानसभेच्या तयारीला लागा! उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना आदेश

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिवसेना आता पुढच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विभागवार आढावा घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिले.

शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यात आला. जिंकलेल्या जागा आणि गमावलेल्या जागा अशा सर्वच जागांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांत संघटना बांधणीबाबत उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्या. एखाद्या मतदारसंघात आपण लढू अथवा लढणार नाही, पण त्या मतदारसंघात आपली संघटना भक्कम असली पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानेही व्यूहरचना आखण्यात आली.

बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हायचे आहे. या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढणार आणि महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करणार, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला, असे संजय राऊत यांनी सांगितले.

लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींना महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढून रोखले आहे. मोदी आणि भाजपला देशात बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आता येत्या विधानसभेलाही शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष ताकदीने लढतील आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करतील.

185 जागा जिंकण्याचे लक्ष्य

जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका. ते योग्यवेळी होईल. तुम्ही राज्यात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी काम करा. विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यापैकी 180 ते 185 जिंकण्याचे महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. ते लक्ष्य डोळय़ापुढे ठेवून कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

महाराष्ट्राचा दौरा करणार

उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी यासाठी हा दौरा असेल. या दौऱ्यात बंदिस्त हॉलमध्ये बैठका व मेळावे होतील. राज्यभर अशा बैठका होणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली असून दौऱ्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.