
124 व्या गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्ञानदीप सेवा मंडळ आणि स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळा हे दोन्ही बलाढय़ संघ जेतेपदासाठी तीन दिवसीय अंतिम सामन्यात ब्रेबर्न स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्यात शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आवर्जून उपस्थित राहणार आहे. शार्दुलच्या हस्ते या सामन्यात नाणेफेक केली जाणार आहे. या नाणेफेकीला मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे क्रिकेट सचिव नदीम मेमनही उपस्थित राहणार आहेत.
गेल्या आठवडय़ात झालेल्या उपांत्य सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेने रिझवी स्प्रिंगफिल्ड संघावर 47 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती, तर दुसऱया उपांत्य सामन्यात ज्ञानदीप सेवा मंडळाने पुन्हा अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. दोन्ही संघ एकास एक असल्यामुळे हा सामना तीन दिवसीय पूर्ण खेळला जाणार, असा विश्वास दोन्ही संघांना आहे.



























































