एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा सत्ता सोडा, काँग्रेसचे भाजप-अजित पवार गटाला आव्हान

राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तीन पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आले आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपवर व भाजप अजित पवारांवर जाहीर, गंभीर आरोप करत आहे. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता? सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे थेट आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे, असा आरोप अजित पवार करत आहेत तर भाजप अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळय़ावर विचारले असता अजित पवार, जय जिनेंद्र व जय जैन बार्ंडग म्हणतात. सरडय़ालाही लाजवेल असे रंग हे लोक बदलत आहेत. सत्तेत राहून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा अजित पवार यांनी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, अन्यथा भाजपने अजित पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाकारावा, पण ते तसे करणार नाहीत. दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजप शिंदे गट व अजित पवार गट यांच्यात नैतिकता राहिलेली नाही, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेसच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारी 2026 रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खासगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे, अशी माहिती काँग्रेसचे धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली आहे.

पुण्यामध्ये ड्रग्जचा
काळा धंदा जोरात

पुणे शहराला मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा व वारसा लाभलेला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख होती, परंतु आता पुण्यात ड्रग्जचा काळा धंदा, कोयता गँग, भ्रष्ट व पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालेले शहर अशी ओळख बनली आहे. आता पुणेकरांनीच आपला पुणेरी बाणा जपला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.