
कारगिल युद्धातील माजी सैनिक आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना SIR अंतर्गत आपली ओळख सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांसह हजर राहण्याची नोटीस निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात आली आहे. या नोटीसमुळे राज्यातील निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) संजय गोयल यांनी या प्रकरणासाठी थेट बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना जबाबदार धरले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
संजय गोयल यांनी सांगितले की संबंधित BLO कडून कर्तव्यात कसूर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. त्यांच्या मते, कॅप्टन फर्नांडिस यांनी भरलेल्या एन्युमरेशन फॉर्ममध्ये 2002 च्या मतदार यादीतील विधानसभा मतदारसंघ आणि पार्ट नंबर नमूद केले नव्हते. याच आधारावर मॅपिंग केले जाते. ही माहिती नसल्याने BLO ने फॉर्मची छाननी करून ती माहिती खासदारांकडून मागवणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने ही चूक घडली, असे गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रणालीकडून मॅपिंग न झालेल्या मतदारांना आपोआप नोटिसा तयार होतात. त्या टप्प्यावरही ही बाब लक्षात आली नाही. मात्र आता उशीर झालेला नसून, खासदारांकडून आवश्यक तपशील घेतले जातील आणि त्यांचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार म्हणून आपली सर्वाधिक काटेकोर तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली होती, असे त्यांनी नमूद केले. “जर एका विद्यमान खासदारालाच अशा प्रकारची नोटीस मिळत असेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे विरोधी पक्ष तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी SIR प्रक्रियेबाबत व्यक्त केलेल्या शंकांना पुष्टी मिळते. ही प्रक्रिया वैध मतदारांची नावे काढून टाकण्यासाठी आणि त्यांना मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेतून दूर ठेवण्यासाठी वापरली जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
खासदार फर्नांडिस यांनी आपण 1989 पासून सातत्याने मतदान करत असल्याचे सांगितले. आपल्या 26 वर्षांच्या सेवाकाळात हिंदुस्थानी नौदलातील विविध नियुक्त्यांदरम्यानही केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकदा गोव्यात ये-जा केल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मागील SIR दरम्यान तयार झालेल्या मतदार यादीशी जुळवणी न झाल्याने किंवा चुकीची जुळवणी आढळल्याने, आपले नाव अंतिम मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत संबंधित अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहून आयोगाने निर्धारित केलेली मूळ कागदपत्रे सादर करावीत.



























































