ईश्वराने मला वाचवले, प्राणघातक हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरले आहे. अब्दुल्ला यांनी या घटनेनंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मी ईश्वराचा आभार आहे की, त्यांनी माझा जीव वाचवला.” ज्यावेळी गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी मला लग्नात फटाके फुटत असल्याचा भास झाला, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागातील रॉयल पार्क हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. एका लग्न समारंभात सहभागी होऊन बाहेर पडताना सत्तरीतील एका वृद्धाने अब्दुल्ला यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी हल्लेखोरावर झडप घातली व त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याने एक गोळी झाडली. त्यात उपमुख्यमंत्री चौधरी जखमी झाले.

यानंतर आज फारुख अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषदेत घेत म्हटले की, “मी बाहेर येत असताना मला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला तातडीने गाडीत बसवले. नंतर समजले की, एका व्यक्तीने पिस्तूल काढून दोन गोळ्या झाडल्या होत्या.” आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणारा तो हल्लेखोर कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता, याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी ६३ वर्षीय कमल सिंह जमवाल याला अटक केली असून तो जम्मूचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला की, तो गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याच्या प्रयत्नात होता. लग्नसमारंभातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर अब्दुल्ला यांच्या अगदी जवळ जाऊन मागून बंदूक रोखताना स्पष्ट दिसत आहे. मात्र सुदैवाने त्याचा नेम चुकला आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ पकडले.