सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा

शेअर बाजार गटांगळय़ा खात असताना सोन्याच्या भावाने आज नवा विक्रम केला. सर्वसामान्यांपासून देशोदेशींच्या मध्यवर्ती बँकांची नजर असलेल्या सोन्याच्या किमतींनी तोळय़ामागे दीड लाखाचा टप्पा पार केला. सोन्याच्या किमतीचा हा आजवरचा उच्चांक आहे.

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 55 हजार 204 वर गेला आहे. कालच्या तुलनेत यात साधारण 7,795 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार 167 झाला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 16 हजार 403 आहे.

शेअर बाजारात 18 लाख कोटी बुडाले!

शेअर बाजारात आज लागोपाठ तिसऱया दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स 271 अंकांची घसरून 81,910 अंकांवर आला. तर निफ्टी 75 अंकांनी पडून 25,158 अंकावर बंद झाला. या घसरणीमुळे अवघ्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 18 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

जागतिक अस्थिरतेचा परिणाम

जागतिक पातळीवर असलेली तणावाची आणि अस्थिरतेची परिस्थिती सोन्याच्या भाववाढीस कारण ठरली आहे. युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे नवे ट्रेड वॉर सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने व चांदीकडे मोर्चा वळवला आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. हिंदुस्थानात सध्या असलेल्या लगीनसराईमुळे देखील यात भर पडली आहे.

चांदीची चमकही वाढली!

सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 3 लाख 20 हजार 75 वर गेला आहे. मागच्या महिनाभरात चांदीच्या दरात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.