सोन्या-चांदीचे दरवाढीचे उच्चांक; चांदी 3500 तर सोने 1200 रुपयांनी वधारले

सोने आणि चांदीच्या किमती या वर्षात जबरदस्त वाढल्या आहेत. आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल 15 हजारांची वाढ झाली. शुक्रवारी चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. तसेच सोन्यानेही मोठी झेप घेतली होती. आता आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोमवारी चांदीच्या किमतीने ३,५०० पेक्षा जास्त वाढ नोंदवत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर नवीन उच्चांक गाठला आहे. चांदीप्रमाणेच तर सोन्याच्या वायद्यांच्या किमतीतही १,२०० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.

वर्षाचा शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. चांदीने सर्व विक्रम मोडत दराचे आतापर्यंतचे उच्चांकी शिखर गाठले आहे. चांदीच्या दरात पुन्हा एकदा वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एमसीएक्सवर व्यवहाराच्या सुरुवातीला चांदी १,७६,४५२ रुपयांवर उघडला. त्याचा मागील बंद १,७४,९८१ रुपये प्रति किलो होता. त्यानंतर वायद्यांच्या व्यवहारात तो वेगाने वाढू लागला व्यापाराच्या १५ मिनिटांतच त्याने १,७८,४८९ चा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे चांदी प्रति किलो ३,५०८ रुपयांनी महाग झाली.

चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही तेज दिसत आहे. 5 फेब्रुवारीच्या समाप्तीच्या सोन्याच्या किमती बाजार उघडताच वाढल्या. प्रति १० ग्रॅम १,३०,७९४ वर व्यापार करत होत्या, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी सोने १,२९,५०४ रुपयांवर बंद झाले. सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ₹१,२९० ने वाढ झाली. सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ होत असली तरी सोन्याचा दर त्याच्या उच्चांकापेक्षा खूप कमी आहे. एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर प्रति १० ग्रॅम १,३४,०२४ आहे आणि सोमवारच्या वाढीनंतरही, तो या पातळीपेक्षा ४,००० रुपयांनी स्वस्त आहे.