
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती अद्याप संपलेली नाही यामुळे जगभरात चिंतेचे ढग कायम आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानांवर स्टॉक मार्केट आणि कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे शुक्रवारीही सराफा बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असली, तरी हिंदुस्थानच्या बाजारपेठेत सोन्याचे भाव एका ठराविक मर्यादेत राहिले.
‘गुडरिटर्न्स’ (GoodReturns) या वेबसाइटनुसार, हिंदुस्थानात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० रुपयांची घसरण होऊन प्रति १० ग्रॅमचा भाव १,६२,२१० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दरही १० रुपयांनी घसरून १,४८,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही स्थानिक बाजारपेठेत किलोमागे १०० रुपयांची घट झाली असून, एक किलो चांदी २,७९,९०० रुपयांवर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्ड्समध्ये घट झाल्यामुळे सोन्याचे दर वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर प्रति ३१.१० ग्रॅम ५,११८.७५ डॉलर्स च्या आसपास होते. चांदीमध्ये १.४ टक्क्यांची वाढ होऊन ती प्रति ३१.१० ग्रॅम ८४.९६ डॉलर्स वर पोहोचली आहे. मात्र, साप्ताहिक स्तरावर विचार केल्यास सराफा दरात सुमारे १ टक्क्यांची घट दिसून आली आहे.
दरावर परिणाम करणारे घटक
इराण-अमेरिका संघर्ष
होर्मुझच्या समुद्रधुनीतील इराणच्या हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा १०० डॉलर्सच्या पार गेले आहेत. इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी समुद्रधुनी बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने तणाव वाढला आहे.
महागाईची भीती
ऊर्जा क्षेत्र महागल्याने महागाई पुन्हा वाढण्याची भीती आहे. यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे ही आपली प्राथमिकता असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे, मग त्यासाठी तेलाच्या किमती कितीही वाढल्या तरी चालतील.
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (१३ मार्च २०२६)
शहर – २४ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम) – २२ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम)
दिल्ली- १६,२३६ रुपये – १४,८८४ रुपये
मुंबई – १६,२२१ रुपये – १४,८६९ रुपये
कोलकाता – १६,२२१ रुपये – १४,८६९ रुपये
चेन्नई – १६,३३० रुपये – १४,९६९ रुपये
चांदीचे दर (प्रति १० ग्रॅम)
शहर – चांदी ९९९ (प्रति १० ग्रॅम)
दिल्ली – २,७९९ रुपये
मुंबई – २,७९९ रुपये
कोलकाता – २,७९९ रुपये
चेन्नई – २,७९९ रुपये


























































