राम दरबाराची गुरुवारी होणार प्राणप्रतिष्ठा, सात मंदिरेही भाविकांसाठी होणार खुली

अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कळस स्थापित करण्यात आल्यामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले आहे. हा अनोखा नजारा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिराच्या ठिकाणी होत आहे. यातच आता मंदिरात 5 जून रोजी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसह सात मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून यासाठीचे विधी 3 जूनपासून सुरू होणार आहेत.

अयोध्येमधील भव्य राममंदिर गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू करण्यात आले आहे. यानंतर मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत आहेत. तर आता राम दरबारासह सात मंदिरांच्या प्रतिष्ठापनेमुळे मंदिराची ख्याती आणखी वाढणार आहे. मंदिराच्या पहिल्याच मजल्यावर रामदरबार स्थापन करण्यात आला आहे. तर कंपाऊंड भिंतीत सहा मंदिरांमध्ये भगवान सूर्य, गणेश, हनुमान, शिव, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. शिवाय सप्त मंडपात सात मंदिरे बांधण्यात आली आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वशिष्ठ, निषादराज, अहिल्या आणि शबरी यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
असा रंगणार सोहळा…

  • प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामलल्लाचे दर्शन सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री योगी आणि काशी-अयोध्येच्या 101 आचार्यांसह, 20 संत-धार्मिक नेते, 15 गृहस्थ आणि ट्रस्टच्या अधिकाऱयांनाही या विधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
  • 2 जून रोजी महिलांकडून शरयू जल कलश यात्रा काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा उत्सवादरम्यान तळमजल्यावर रामलल्लाचे दर्शन सुरू राहील. 3 जूनपासून सर्व मंदिरात सकाळी 6.30 वाजल्यापासून विशेष प्रार्थना सुरू होतील आणि रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.