महामुंबईकरांसाठी खुशखबर; नेरुळ, बेलापूर-उरण मार्गावर 10 लोकल फेऱ्या वाढणार

महामुंबईकरांना रेल्वे मंत्रालयाने वर्षाच्या अखेरीस मोठी खुशखबर दिली आहे. नेरुळ, बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर १० लोकल फेऱ्या वाढवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देऊन या नवीन लोकल लवकर सुरू करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या मार्गावरील तरघर आणि गव्हाण रेल्वे स्थानकांचे उद्घाटन येत्या २५ डिसेंबरच्या आत करण्याचे नियोजनही मध्य रेल्वेने केले आहे.

नेरुळ, बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर सध्या लोकलच्या ४० फेऱ्या होतात. त्यामध्ये नेरुळमधून उरणच्या दिशेने दहा, तर बेलापूरमधून उरणच्या दिशेन १० लोकल सोडल्या जात आहेत. उरणमधून नेरुळ आणि बेलापूरसाठी २० लोकलची सेवा उपलब्ध आहे. आता त्यात आणखी १० फेऱ्यांची भर पडणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर १० फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार सहा फेऱ्या बेलापूरसाठी तर चार फेऱ्या नेरुळसाठी चालवल्या जाणार आहेत. उरण, जासई, उलवे यासारख्या भागातून नेरुळ, बेलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अधिक लोकलची गरज निर्माण झाली आहे.

रेल्वे स्थानके बांधून तयार
नेरुळ-उरण मार्गावर नवी मुंबई विमानतळाजवळ असलेले तरघर आणि खारकोपर ते शेमटीखारच्या दरम्यान असलेले गव्हाण रेल्वे स्थानक बांधून तयार आहे. मात्र अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही. ही स्थानके सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. येत्या २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यापूर्वीच या रेल्वे स्थानकांचे उद्घाटन होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर १० लोकल फेऱ्या वाढवण्यास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय निलम यांनी मंजुरी दिली आहे. तरघर रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.