
बांगलादेशची आर्थिक स्थिती प्रचंड बिकट असून शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देण्यास पैसे नसल्याने देशभर काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. मोठय़ा संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरून अंतरिम सरकारच्या धोरणाविरोधात प्रचंड संताप व्यक्त करताना आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिक आणि शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशातील प्रमुख व्यावसायिक समुदायाचे नेते शौकत अझीज रसेल यांनीही देशाची आर्थिक स्थिती प्रचंड खराब असल्याचा दावा केला आहे.
प्रस्तावित सरकारी सेवा (सुधारणा) अध्यादेश 2025 विरोधात निदर्शने सुरू असून सरकारी कर्मचाऱ्यांनी हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली आहे. हा काळा कायदा असून या अध्यादेशामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि त्यांना कामावरून काढून टाकणे सोपे झाल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.