सरकारी रुग्णालयांची मदार शिकाऊ परिचारिकांवर, बेमुदत संपामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्र्यांना भेटण्यास वेळ नाही

तुटपुंजा पगार आणि कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील 30 हजारांहून अधिक परिचारिका बेमुदत संपावर गेल्या आहेत. तसेच आझाद मैदानातही धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुंबईतील 5 हजार परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या संपामुळे सरकारी रुग्णालयांची मदार सध्या शिकाऊ परिचारिकांवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी व्यस्त असल्याचे कारण देत भेट दिली नाही, असा आरोप परिचारिका संघटनेने केला.

तीन तास वेटिंगवर ठेवून आरोग्यमंत्री भेटलेच नाहीत

17 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे पदाधिकारी आपल्या मागण्या घेऊन विधिमंडळात पोहोचले. आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर परिचारिकांचे म्हणणे ऐपून घेणार होते;  परंतु त्या ठिकाणी गोंधळ उडाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान राडा झाला. हे कारण देत पदाधिकाऱ्यांना तीन तास वाट पाहायला लावली; परंतु तब्बल तीन तास वेटिंगवर ठेवून आरोग्यमंत्री काही भेटलेच नाहीत , असे संघटनेचे राज्य खजिनदार राम सूर्यवंशी म्हणाले.

परिचारिकांच्या संपामुळे आरोग्यसेवेवर थोडासा परिणाम झाला; मात्र आम्ही संप लक्षात घेऊन नियोजन केले होते. शिकाऊ परिचारिकांची नियुक्ती केली.- संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, जे.जे. रुग्णालय

50 टक्के पदे रिक्त

सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये 50 टक्के परिचारिकांची पदे रिक्त आहेत. असे असताना तात्पुरत्या पंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याला विरोध आहे, अशी माहिती संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी फक्त तीन मिनिटे दिली

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे व्यथा मांडण्यासाठी गेलो; परंतु त्यांनी प्रचंड व्यस्त असल्याचे सांगत केवळ तीन मिनिटे दिली. तीन मिनिटांत मागण्या मांडायच्या कशा, असा सवाल परिचारिकांनी केला.