
आखाती देशातींल तणावाच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत LPG गॅसची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळेच आता देशभरामध्ये सर्वच ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात, बुधवारी सकाळपासून सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पीपीगंज पोलिस स्टेशन परिसरातील आशिष इंडेन गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये हिंसक हाणामारी झाली. सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास जबरदस्तीने लाईनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. ही हाणामारी इतकी टोकाला पोहोचली की विचारता सोय नाही.
पोलिस घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी यावेळी दोन्ही गटातील तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर कडक इशारा देऊन सोडून दिले. पीपीगंजमध्ये गॅस सिलिंडरसाठी सकाळपासूनच लांब रांगा लागल्या आहेत. काही जणांनी रांग सोडून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हाच या वादाला तोंड फुटले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा वाद इतका वाढला की एका तरुणाला जमिनीवर फेकण्यात आले आणि त्याला जबर मारहाण करण्यात आली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी, मारामारी करणाऱ्यांना तात्काळ रोखले आणि आता गॅस एजन्सीमध्ये अतिरिक्त दक्षता ठेवण्यात येत आहे.
सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक अन्न अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कोटा कपातीमुळे गॅसचा तुटवडा असल्याचे वृत्त आहे. पीपीगंजमधील या एजन्सीमध्ये सुमारे 30 हजार ग्राहक नोंदणीकृत आहेत, परंतु मागणीपेक्षा पुरवठा लक्षणीयरीत्या कमी आहे. या टंचाईमुळे ग्राहकांचा संयम संपत चालला आहे आणि दररोज वादाची परिस्थिती निर्माण होत आहे.

























































