
सरकारी टेलिकॉम कंपनी महानगर टेलिपह्न निगम लिमिटेड (एमटीएनएल) चांगलीच अडचणीत सापडली आहे. एमटीएनएलने शेअर बाजाराला कर्जासंबंधी माहिती दिली असून एमटीएनएलवर एकूण सात बँकांचे तब्बल 8 हजार 585 कोटी रुपयांचे कर्ज असून हे कर्ज फेडण्यात एमटीएनएल कमी पडत असल्याचे एमटीएनएलने म्हटले आहे. एमटीएनएलने सांगितले की, ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत कर्जाची फेड करण्यात उशीर झाला आहे. कंपनीने बँकांना 7794.34 कोटी रुपये मुदत आणि 790.59 कोटी रुपयांचे व्याज देणे बाकी आहे. ज्या बँकांकडून एमटीएनएलने कर्ज घेतले आहे. त्यामध्ये यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, यूको बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा समावेश आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
कंपनीवर एकूण किती कर्ज
एमटीएनएलवर एकूण 34 हजार 484 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये बँकेकडून घेतलेले कर्ज सरकारच्या गॅरंटीचे बॉण्ड आणि टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. 8585 कोटी रुपयांचे बँकेकडून घेतलेले कर्ज, 24071 कोटी रुपयांचे सरकारच्या गॅरंटीचे बॉण्ड आणि 1828 कोटी रुपयांचे टेलिकम्युनिकेशनकडून घेतलेले कर्ज आहे.
कोणत्या बँकेचे किती पैसे
युनियन बँक ऑफ इंडिया 3733.22 कोटी रुपये
बँक ऑफ इंडिया 1121.09 कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक 474.66 कोटी रुपये
स्टेट बँक ऑफ इंडिया 363.43 कोटी रुपये
युको बँक 273.58 कोटी रुपये
पंजाब अँड सिंध बँक 184.82 कोटी रुपये
इंडियन ओव्हरसीज बँक 2434.13 कोटी रुपये