
सरकारने आता तरी मणिपूरकडे लक्ष द्यावे. तेथे शांतता नांदण्याची मणिपूरमधील जनता आतुरतेने वाट पाहत आहे. लोकसभा निवडणूक संपली असून त्यावरील चर्चा आता थांबवावी, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एनडीए सरकारचे कान टोचल्यानंतर गृहमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारप्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेतली. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मैतेई आणि कुकाRशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. तसेच मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देशही दिले. आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन मणिपूरमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मदत शिबिरांची वेळोवेळी तपासणी. तेथे भोजन, पाणी, औषधे तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मदत शिबिरांमधील नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य व्यवस्था, मुलांना शिक्षण सामुग्री इत्यादी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश अमित शहा यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सरकार मणिपूरमधील लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे अमित शहा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.