
साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भिवंडी पालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन आता लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली. महापौर आणि उपमहापौर विराजमानदेखील झाले. मात्र भिवंडी महापालिकेत गटनेत्यांना दालनेच नसल्याने लोकप्रतिनिधीनी बसायचे कुठे? असा प्रश्न नगरसेवकांना उभा ठाकला आहे. त्यामुळे कोणी कार्यालय देता का कार्यालय ? अशी मागणी जणू गटनेत्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर मार्चमध्ये दोन्ही कार्यालये सुरू झाली आहेत, परंतु तीन महिने उलटून गेल्यानंतरही भिवंडी पालिकेतील विविध पक्षांचे गटनेता कार्यालय बंद असल्याने नगरसेवकांना बसण्यासाठी जागाच नाही. भिवंडी पालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी, कोणार्क विकास आघाडी यांच्या गटांची नोंद कोकण विभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे गटनेते नियुक्त करण्यात आले आहेत, परंतु ही कार्यालये कुलूपबंद अवस्थेत आहेत.
कार्यालयातील कामानंतर प्रभाग गाठावा लागतो
महापालिकेत कामानिमित्त आलेल्या नगरसेवकांना एक तर महापौर किंवा उपमहापौर कार्यालयात आधार घ्यावा लागतो. मात्र या दोन्ही कार्यालयात नागरिकांचा राबता असल्याने सर्वत्र गर्दी होते. त्यामुळे कार्यालयातील काम झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना आपला प्रभाग गाठावा लागत आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरील गटनेता कार्यालयांची रंगरंगोटी सुरू असून नव्याने फर्निचर लावण्यासाठी कार्यालयातील खुर्य्या, सोफा बाहेर पॅसेजमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.


























































