पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. महिनाभरात वाकड, पिंपरी, चिंचवड पाठोपाठ निगडीत शनिवारी (दि. 10) रात्री वाहन तोडफोडीची सातवी घटना आहे. वाढदिवसानंतर दारूपार्टी केलेल्या तिघांनी नशेत दोन तरुणांना मारहाण केली. त्यानंतर परिसरातील तब्बल १८ वाहनांची कोयत्याने तोडफोड करत दहशत माजवली. ही घटना निगडी ओटास्कीम येथे जिवलग हौसिंग सोसायटीजवळ घडली. निगडी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तेजस कांबळे (रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
शिवाजीनगर पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या एका आरोपीची मावशी जिवलग हौसिंग सोसायटीत राहते. मावशीच्या मुलीचा शनिवारी (दि. 10) वाढदिवस होता. त्यासाठी आरोपी आला होता. आरोपीसह तिघांनी दारूपार्टी केली. त्यानंतर दारूच्या नशेत रस्त्याने जाताना त्यांचा तेजस आणि त्याच्या मित्राबरोबर वाद झाला. आरोपीने त्याच्याकडील कोयत्याच्या उलट्या बाजूने तेजसला आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या रिक्षा, स्कूल बस, टेम्पो ट्रॅव्हल, टेम्पो अशा तब्बल 18 वाहनांची तोडफोड केली आणि परिसरात दहशत माजवली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करीत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या आरोपीवर यापूर्वी मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.