गुढीपाडवा

शौर्याची… तेजाची काठी….आसावरी जोशी,[email protected]

संपूर्ण गुढी ज्यावर पेलली जाते त्या काठीला आपल्या देशात प्राचीन परंपरा आहे… उत्सवाची… खेळाची… शौर्याची…

शस्त्रपूजा… शौर्याची पूजा… तेजाची पूजा… हा आपल्या उत्सवांचा स्थायीभाव… गुढीपाडवा, विजयादशमी, दीपावली… साऱया सण उत्सवांतून अनिष्ठावर चांगल्याचा विजय.. ही परिकल्पना.. या कल्पनेतूनच शौर्याची.. तेजोमयाची पूजा साकारली जाते.. दसऱयाचे शस्त्रपूजन तर सर्वश्रुतच आहे. गुढीपाडवा म्हणजे विजयोत्सवच.. रामाने १४ वर्षांच्या वनवासातून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. म्हणून त्याचे स्वागत गुढय़ा उभारून केले गेले. शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने सहा हजार मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून शकांचा पराभव केला. याच दिवशी त्याच्या नावाने शक सुरू होऊन कालगणना सुरू झाली.

गुढीपाडव्याचे गुढीपूजनदेखील अत्यंत अर्थपूर्ण आहे.. याला अनेक धार्मिक संदर्भ असले आणि त्यातून अनेक अन्वयार्थ निघत असले तरी गुढीपूजनातील काठीपूजन हे खऱया अर्थाने शौर्याचे.. तेजस्वीतेचे आणि आपल्या रोजच्या जगण्याशी अत्यंत सांगड घालणारे आहे. गुढीबरोबरच तिला पेलणाऱया काठीचेही पूजन केले जाते.. आणि मला असे वाटते की हे आपल्या वास्तव जगण्याशी अत्यंत समर्पक आहे. स्वसंरक्षणाचे एक उत्तम साधन, कलात्मक क्रीडाप्रकार आणि शरीराचे सर्वांगीण आरोग्य राखणारा एक प्राचीन पण तितकाच नित्य नूतन व्यायाम प्रकार..

महाराष्ट्राप्रमाणे त्रिपुरा, राजस्थान, मध्य प्रदेशात काठी पूजेची आणि काठीनृत्याची परंपरा आहे. एवढेच नव्हे तर बाहेरील देशातही काठीपूजनाच्या परंपरेचे दाखले मिळतात. हे झाले केवळ धार्मिक अंगापुरते. पण काठी म्हणजे शौर्य, संरक्षण याचे प्रतीक. म्हणूनच आपल्याकडे लाठीकाठीच्या खेळाची प्राचीन परंपरा आहे.

देवरुखजवळच्या मुरादपूर गावात मंगल प्रसंगी अशा मर्दानी खेळांचे प्रदर्शन हा त्या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग असतो. शेवटी सण, वार, उत्सव हे कशाकरता साजरे केले जातात. यातून आपले जीवन समृद्ध व्हावे, शरीर आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून.. त्यासाठी या डोळस आणि सक्षम प्रथा जोपासणे, त्या वाढविणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे…

 

काठीचा खेळ

आजच्या अनेक आधुनिक व्यायामप्रकारात हे काठीचे खेळ स्वतःचे वैशिष्टय़ राखून आहेत. खास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मुली, स्त्रिया या लाठी खेळाची प्रात्याक्षिके करतात. हा केवळ खेळ नसून ती एक कला आणि सर्वांगीण व्यायाम आहे. काठी फिरवताना संपूर्ण शरीराची लयबद्ध हालचाल होते. केवळ एक मिनीट काठी प्रचंड वेगाने फिरवल्यास सर्वाधिक उष्मांक खर्च होतात. पूर्वी सामान्य माणसाचे काठी स्वसंरक्षणासाठी एक महत्त्वाचे आणि सहज परवडणारे शस्त्र होते. चक्राकार, चौपदी, दौड, बनेठी असे या कलेचे प्रकार आहेत. हातात काठी धरून ती सातत्याने फिरवायला लागत असल्याने बोट, मनगट, संपूर्ण हात, स्नायू, मान, चेहरा, पाय, खांदा, छाती आणि पोटाच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. आज या खेळात तरुणींचा सहभाग वाढतो आहे. शोभायात्रांतून स्त्रियांच्या या खेळाचे प्रदर्शन त्यांच्यातील तेजस्वितेचे दर्शन घडविते. या खेळाच्या नियमित सरावामुळे शारीरिक क्षमतेत प्रचंड वाढ होते. आत्मविश्वास वाढतो.

जतर काठी

कोकणात चैत्रात होणाऱया यात्रांमध्ये जतर काठी येते. १५ ते २० फुटांचा हा अखंड बांबू असतो. घुंगरू, फुले, हार यांनी सजवलेला असतो. जत्रेच्या आदल्या दिवशी रात्री वाजतगाजत ही काठी निघते आणि जत्रेच्या दिवशी देवस्थानी पोहोचते.

काठीकवाडी

नाशिक जिह्याच्या वीरगाव येथे गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत दर सोमवारी काठीची मिरवणूक निघते. याला काठीकवाडी म्हणतात. काठीकवाडी म्हणजे खूप उंच आणि जोड काठी असते. या काठीला एक आडवी फळी जोडलेली असते. त्यावर पितळेची शंकराची मूर्ती आणि पिंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी गावकरी ही काठी नदीतून स्वच्छ धुऊन आणतात. तिची यथासांग पूजा करून त्या काठीला नवे कापड गुंडाळतात. वरच्या टोकाला मोरपिसे आणि भगवे कापड फडकवतात. ही काठी म्हणजे त्या गावाची रक्षणदेवता असते.

नंदध्वज

सोलापूरला गड्डा यात्रेत सात काठय़ांची मिरवणूक असते. संक्रांतीला ही यात्रा भरते. याला नंदध्वज म्हणतात. ही काठी म्हणजे सिद्धरामेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक असते. एका कुंभारकन्येला सिद्धरामेश्वरांशी विवाह करायचा होता. त्यासाठी तिने घोर तप केले. देवाला तर विवाह करायचा नव्हता. तेव्हा त्यांनी तिचा विवाह आपल्या योगदंडाशी लावून दिला. हा विवाह सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. या काठय़ा पूर्ण सजवलेल्या ३०-४० फूट उंच असतात.

आपल्या मराठमोळ्या मुली लग्न करून अमराठी झाल्या आहेत. पण तेथेही आपल्या मराठी संस्कृतीची गुढी प्रेमाने उभारली आहे....

– रेणुका शहाणे….गोडधोड खाण्याची संधी

गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रात खूप हौसेने, उत्साहात साजरा केला जातो. पण आशुतोष राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर मला समजले की त्यांच्या समाजात गुढीपाडवा हा सण साजरा केला जात नाही. पण मग मीच माझ्या घरी गुढी उभारण्यास सुरुवात केली आणि आता दरवर्षी आम्ही मोठय़ा उत्साहात आमच्या घरी गुढी उभारतो. या दिवशी आम्ही सगळेजण गुढी उभारल्यावर गुढीची पूजा करतो आणि मग घरी गोडाचे जेवण असते. माझ्या मुलांना तसे गोड पदार्थ आवडत नाहीत. पण श्रीखंड आवडते मग पुरी आणि श्रीखंड असा बेत असतो. या दिवशी डाएट वगैरे मी आणि राणाजी विसरुन जातो. गुढीपाडव्याला अशी ठरवून खरेदी करत नाही, कारण साधारण वर्षभर वेगवेगळया वेळी खरेदी होतच असते. यंदाच्या वर्षीही छान श्रीखंड पुरी करण्याचा मानस आहे.

नवीन वर्ष कुटुंबासह साजरा करण्याची संधीच

– रुफीना श्रोत्री

पुष्कर श्रोत्री यांची बेटर हाफ अर्थात बायको रुफीना ही खरे तर ख्रिश्चन… पण गेल्या काही वर्षांत गुढीपाडवा साजरा करण्यात रुफीनाच जास्त आघाडीवर असते. याबाबत रुफीना सांगते की, आम्ही सगळे एकत्र जमलो की घरी गुढी उभारतो, पूजा करतो. गुढीपाडव्याला वालाचं बिरडं (पुष्करला प्रचंड आवडते), पुरी, आम्रखंड, मसालेभात, टॉमेटोचे सार, आमरस असा बेत असतो. मला मसालेभात आणि टॉमेटोचे सार खूप आवडते. अनेकदा हा मसालेभात बनवण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेते. माझ्या माहेरी आम्ही अनेकदा केळीच्या पानावर जेवण जेवायचो. आता तर पुष्करकडेपण ही पद्धत आहेच. त्यामुळे केळीच्या पानावर जेवण जेवण्याची मजा येतेच… आम्ही घरी गुढीपाडव्याबरोबरच ख्रिसमस ईस्टरही साजरा करतच असतो. पण मग आम्ही आमची मुलगी शनायासाठी काहीतरी आर्वजून खरेदी करतो… आणि मग घरासाठी काही वस्तू हवी तर घेतो. मुळातच गुढीपाडवा हा सण आनंद देणारा, कुटुंबाला एकत्र आणणारा सण आहे असे मला वाटते.

परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न

– शिल्पा शिरोडकर

गुढीपाडवा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आम्ही सर्वजण पारंपरिक पोशाखात आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करतो. या दिवशी सगळे नातेवाईक आमच्या घरी येतात. गुढीपाडवा हा शुभमुहुर्त असल्यामुळे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच खास असतो. आपली संस्कृती, पावित्र्य यानिमित्ताने आपण जपतो. आम्ही सर्व घरी गुढीपाडव्याला या सणाचे मांगल्य, पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक गुढी उभारणे, गुढीची पूजा करणे असे सगळे केले जाते. तर त्यानंतर पारंपरिक पुरणपोळी आम्ही घरी बनवतो. मला अजूनही तितकी चांगली पुरणपोळी बनवता येत नाही पण माझ्या सासूबाई खूप चांगली पुरणपोळी बनवितात. पण मी पुरण बनवणे, पुरणपोळीसाठीची तयारी करुन देणे अशी कामे अगदी मनापासून आणि आवडीने करते. आमची मुलगी अनुष्का गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात पुढे असते. माझ्या मते गुढीपाडवा हा सण उत्साहाचा आणि आनंदाचा तर आहेच पण या सणामुळे अख्खे कुटुंब एकत्र येते. पूर्ण दिवस कुटुंबाबरोबर साजरा करून सण साजरा करण्याची मजा काही औरच आहे.

एकत्र सण साजरा करण्याची संधीच -अमृता खानविलकर

माझ्यासाठी कोणताही सण उत्सव ही मला आणि हिमांशुला एकत्र येण्याची मिळालेली संधी आहे असे मी मानते. मी खरे तर पुण्याची आहे, पण आता कामानिमित्त आम्ही मुंबईकर झालो आहोत. आम्ही दरवर्षी अगदी पारंपरिक पद्धतीपणे गुढीपाडवा साजरा करतो. लहानपणापासूनच आमच्या घरी सकाळी लवकर उठून आंघोळ करणं, गुढी उभारणे या गोष्टी आई करायची. त्यामुळे अर्थातच ते संस्कार आमच्यावर झाले. गुढीपाडव्याला मी साडी नेसते. मस्त तयार होते. आमच्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना सगळ्यांना फोनवरून आम्ही शुभेच्छा देतो. यंदाही मला हिमांशु काय भेट देतोय याची उत्सुकता आहेच. माझी आई आणि माझी सासू या दोघीही उत्तम स्वयंपाक बनवतात. त्यामुळे या दिवशी मस्त जेवण्याची, गोडधोड खाण्याची एक चंगळच असते. त्यामुळे नववर्षातील या पहिल्या सणाची मी नेहमीच वाट पाहत असते आणि हा सण अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा करते.

 

 

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या