Gudipadava festival – नववर्षात कसे असेल पर्जन्यमान, पीकपाणी, धनधान्य…जाणून घ्या नववर्षफल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. यंदा 19 मार्च रोजी नववर्ष सुरू होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला संवत्सरफल वाचण्याची किंवा ते श्रवण करण्याची प्राचीन पंरपरा आहे. या नववर्षफलात पर्जन्यमान, पीकपाणी, धनधान्य याबाबतची ढोबळ भाकिते करण्यात आलेली असतात. जाणून नवीन वर्ष सर्वसामान्यांना कसे असेल, त्याचे देशभरात आणि जगभरात काय परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

यंदा कलियुग शक (युगाब्ध) 5128 असून महावीर संवत 2552-53, विक्रम संवत 2082-83, शालिवाहन शक 1948, शिवशक 352-53 आहे. म्हणजे पाश्चात्य दिनदर्शिकेप्रमाणे इसवीसन 2026-27 आहे. ही या संवत्सराची प्राथमिक ओळख आहे. यंदा विक्रम संवत 2082-83 असून पराभव नावाचे संवत्सर आहे.

अथ स्वस्ति श्रीमन्नृपविक्रमार्क समयातीत (गुजराती) संवत् २०८२ पिंगलनाम संवत्सरे (मारवाडीय संवत् २०८३ कालयुक्तनाम संवत्सरे) तथा श्रीमन्नृपशालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सरे राजा गुरुः। मंत्री भौमः। कोषाधिपः शुक्रः। मेघाधिपः चंद्रः । पूर्वसस्याधिपः गुरुः। सेनादुर्गयोरधिपः चंद्रः । छत्रचन क्षेत्राणामधिपः गुरुः। रसाधिपः शनिः। आज्ञाधिपः चंद्रः । मध्यपश्चाद्धान्याधिपः बुधः। नीरसेशः गुरुः। व्यापार-फल-खेटक-प्रतापानामधिपः शनिः । व्यवहार – वस्त्र काष्ठानामधिपः चंद्रः। नगराधिपः चंद्रः। सर्वेषामधिपः गुरुः । इत्यधिपाः। आदौ संवत्सरफलम् । अग्रधान्यमधिकं जलमल्यं भूभृतां भवति युद्धमनल्पम् । स्याज्जनो गदवशाद्रतधामा वत्सरो यदि पराभवनामा ॥

या पराभवनाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील. तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजा गुरु असल्याने काही भागात पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. धार्मिक कार्यात लोकांची रुची वाढेल. पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. मेघाधिप चंद्र असल्याने काही ठिकाणी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.

संवत्सराचा राजा गुरू असल्याने संपत्ति वाढून लोकांना आनंद होईल. सुख, शांती, समाधानाचे वातावरण असेल. सोने, चांदी, तांबे, लोखंड या धातूंच्या किमती गगनाला भिडणार आहेत. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूधदुभते मुबलक मिळेल. सर्व रत्ने सोने, कापुस, सुपारी, चंदन या पदार्थांची मागणी वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून दूधदुभते चांगले होणार आहेत. यंदा पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर या प्रमाणे इंद्र वर्षाव करील.

पंचागात दिलेल्या या संवत्सरफलानुसार यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच संवत्सराचा मंत्री मंगळ असल्याने यंदा तापमानवाढ मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. तसेच मंगळाच्या प्रभावामुळे सरकारविरोधात बंड झाले तरी बळाचा वापर करत ते रोखण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पराभव नावाचे संवत्सर असल्याने सरकारवर दबाव राहणार आहे. तसेच काही ठिकाणी सत्ताबदलाचीही शक्यता आहे.

संवत्सराचा मंत्री मंगळ असल्याने जगभरात युद्धजन्य परिस्थिती, संघर्ष राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मात्र, या सर्व संघर्षमय परिस्थितीत राज गुरु असल्याने सकारात्मकतेच पाठबळही कायम राहणार आहे. अशाप्रकारे संवत्सरफलातून अर्थ काढण्यात येत भाकीते वर्तवण्यात आले आहे.