
गुजरातमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक मुले आजारी पडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गांधीनगरमधील विविध भागांत गेल्या काही दिवसांत दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने शंभरहून अधिक मुले आजारी पडली आहेत आणि त्यापैकी अनेकांना टायफॉईडचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने गांधीनगर सिव्हिल रुग्णालयात मुलांना दाखल करण्यासाठी नवीन वॉर्ड सुरू करावा लागला आहे.
सध्या सिव्हिल रुग्णालय आणि सेक्टर 24 व 29 येथील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये एकूण 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या प्रकरणात सहा वर्षांच्या एका मुलीचा टायफॉईडमुळे मृत्यू झाला असून त्याच कुटुंबातील दुसरे मूल सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या कुटुंबातील चारही मुलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे.
गांधीनगरमधील सेक्टर 24, 26, 28 आणि आदिवाडा हे भाग सर्वाधिक प्रभावित मानले जात आहेत. या भागांत 75 आरोग्य पथके तैनात करून सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू आहे. आतापर्यंत 20,800 हून अधिक घरांना भेट देत सुमारे 90 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. प्रभावित भागांत 24 तास ओपीडी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने 30 हजार टायफॉईडविरोधी गोळ्या आणि 20 हजारांहून अधिक ओआरएसचे पॅकेट्स वितरित केले आहेत. नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिकांचा आरोप आहे की नळांना पाणी येत नाही आणि मोटारद्वारे मिळणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येते. याच दूषित पाणी प्यायल्यामुळे आजार पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नगरपालिकेने सोमवारपर्यंत 24 तास पाणीपुरवठ्याचा स्विचओव्हर पूर्ण होईल आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असा दावा केला आहे.



























































