गुजरातमध्ये गॅसचा तुटवडा, कारखाने बंद झाल्याने खायचे वांदे; सुरतहून हजारो मजूर घराकडे निघाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे हिंदुस्थानात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हिंदुस्थानातील औद्योगिक शहरात गॅस मिळणे अवघड झाले आहे. याचा थेट फटका कारखान्यांना झाला आहे. कारखाने बंद झाल्याने आणि हाताला काम नसल्याने हातावर पोट भरणाऱया लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. गुजरातच्या सुरतमधून हजारो मजुरांनी आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन गावाकडची वाट धरली आहे.

गुजरातच्या सुरतमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा झाल्याने याचा थेट फटका छोटय़ा उद्योगांवर आणि कारखान्यांवर पडला आहे. एलपीजी गॅसच्या कमरतेमुळे फॅक्टऱया तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जात आहेत. यामुळे मजुराच्या रोजगारावर आणि रोजीरोटीवर संकट ओढावले आहे. यामुळे शहरात उपाशी मरण्यापेक्षा हजारो मजुरांनी आपापल्या गावाचा रस्ता धरला आहे. हजारो मजूर गुजरातहून गावाकडे निघाले आहेत. सुरतमध्ये काम करणाऱया सचिन नावाच्या एका मजुराने सांगितले की, आम्ही बरेच जण गावाकडे निघालो आहोत. कारण काही दिवसांपासून आम्हाला गॅस मिळत नाही. आम्ही ज्या पंपनीत कामाला होतो, तीसुद्धा बंद होत आहे. यामुळे या ठिकाणी भुकेने मरण्यापेक्षा आम्ही गावाला जात आहोत. आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही गावी जात आहोत. शहरात कोणी कोणाला मदत करत नाहीत. ज्या दिवशी गॅस पुरवठा सुरळीत होईल, त्या दिवशी आम्ही शहरात परतू, असे सचिनने सांगितले. सुरतमध्ये 500 रुपये लिटर गॅस मिळत आहे. आमच्याकडे तर पैसेच नाहीत, त्यामुळे आम्ही गावाला जाणे पसंत करत आहोत, असेही सचिनने सांगितले. गॅसच्या तुटवडय़ामुळे मजुरांनी आपापल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. युद्धाचा थेट फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून गॅसच्या तुटवडय़ावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

15 दिवसांपासून गॅस नाही

आम्ही 500 ते 1 हजार रुपये रोज याप्रमाणे मजुरी करतो. गेल्या 15 दिवसांपासून आम्हाला गॅस मिळत नाही. एक आठवडय़ापूर्वीच आमचा गॅस संपला. छोटे सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही मिळाला नाही. गॅसच्या समस्येमुळे आम्ही गावाला जात आहोत, असे सीमा देवीने सांगितले. सध्या मी आणि माझी मुलगी गावाला जात आहोत. पती आणि दोन मुले इथेच राहणार आहेत, असेही सीमा देवीने सांगितले.