IPL 2026 – गुजरात टायटन्सची लखनौ सुपर जायंटस्ला धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात टायटन्सने यजमान लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धडक देत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय मिळविला. आधी कमालीची पंजूष गोलंदाजी करीत लखनौला 164 धावांवर रोखल्यानंतर गुजरातने सात फलंदाज आणि आठ चेंडू राखून सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रसिध कृष्णाने टिपलेले चार बळी आणि कर्णधार शुभमन गिल व जोस बटलर यांनी ठोकलेली अर्धशतके ही गुजरातच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. भन्नाट गोलंदाजी करणारा प्रसिध कृष्णा या विजयाचा मानकरी ठरला.

लखनौ सुपर जायंट्सकडून मिळालेले 165 धावांचे माफक लक्ष्य गुजरात टायटन्सने 18.4 षटकांत केवळ तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर साई सुदर्शन 15 धावांवर लवकर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर शुभमन गिल (56) व जोस बटलर (60) यांनी दणकेबाज अर्धशतके झळकावीत लखनौची गोलंदाजी निष्प्रभ केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूंत 84 धावांची भागीदारी केली. गिलने 40 चेंडूंत सहा चौकार व एक षटकार लगावला, तर बटलरने 37 चेंडूंत 11 चौकार ठोकले. प्रिन्स यादवने गिलला यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर मोहम्मद शमीने बटलरला मार्करमकरवी झेलबाद केले. हे दोघे बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 21) व राहुल तेवतिया (नाबाद 10) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. लखनौकडून प्रिन्स यादव, दिग्वेश राठी व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

प्रसिध कृष्णाची अचूक गोलंदाजी

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 बाद 164 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून सलामीवीर एडेन मार्करम सर्वाधिक 30 धावा करणारा फलंदाज ठरला. मिचेल मार्शला (11) पॅगिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात गिलकरवी झेलबाद करून गुजरातला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार ऋषभ पंतला (18) तेवतियाकरवी झेलबाद करून लखनौला मोठा हादरा दिला. मग प्रसिध कृष्णाने सलामीवीर मार्करमसह मधली फळी कापून काढल्याने लखनौच्या फलंदाजीतील हवाच गुल झाली. त्याने आयुष बदोनी (9) व निकोलस पुरन (19) असे बहुमोल बळी टिपले. मग अशोक शर्मानेही अब्दुल समद (18) व ‘इम्पॅक्ट प्लेयर’ जॉर्ज लिंडे (16) यांना बाद करून लखनौच्या धावगतीला ब्रेक लावला. शेवटी मोहम्मद सिराज (नाबाद 12) व आवेश खान (नाबाद 4) यांनी फटकेबाजी केली म्हणून लखनौला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. गुजरातकडून प्रसिध कृष्णाने 28 धावांत चार फलंदाज बाद केले. अशोक शर्माने दोन, तर मोहम्मद सिराज व पॅगिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.