फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूत एका लग्न समारंभात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सोबत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी गोळीबारात जखमी झाले.

जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागातील रॉयल पार्क हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. एका लग्न समारंभात सहभागी होऊन बाहेर पडताना सत्तरीतील एका वृद्धाने अब्दुल्ला यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी हल्लेखोरावर झडप घातली व त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याने एक गोळी झाडली. त्यात उपमुख्यमंत्री चौधरी जखमी झाले.

हल्लेखोर नशेत होता!

पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. कमलसिंह जमवाल असे त्याचे नाव आहे. जम्मूतील पुरानी मंडीचा रहिवासी असलेला कमलसिंह हा उद्योजक आहे. हल्ला केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले.