
ज्ञानदानाचे काम करतानाच ठाणे जिल्ह्यातील पोई गावचे प्राथमिक शिक्षक गुरुनाथ सांबरे यांनी शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. सांबरे गुरुजींनी स्ट्रॉबेरी, सुरण, आले, हळद, झेंडू आदी पिके, फुले, फळे आणि भाजीपाला पिकवून नावलौकिक मिळविला आहे. आता तर त्यांनी सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. प्रयोगशील शेती करून त्यांनी ‘पिवळे सोने’ पिकवून एकरी नऊ क्विंटल उत्पादन घेतले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सूर्यफूल शेती हा उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. गुरुनाथ सांबरे यांनी जिल्हा परिषद ठाणे व कल्याण पंचायत समिती कृषीमार्फत शेष फंडांतर्गत सूर्यफुलाची एक एकर शेती केली. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून सूर्यफूल शेती यशस्वी केली. तसेच त्यांनी पोई गावातील इतर शेतकऱ्यांनाही सूर्यफूल लागवडीसाठी प्रोत्साहित केले. यासाठी त्यांना जिल्हा कृषी अधिकारी बाचोटीकर, कृषी अधिकारी शिंदे व कृषी विस्तार अधिकारी संत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गुरुनाथ सांबरे यांनी जिल्हा परिषद शेष फंडांतर्गत पोई गावात एक एकर क्षेत्रावर डिसेंबरमध्ये गळीतधान्य तेलबिया सूर्यफूल शेती करून शेतात पिवळे सोने पिकवले. त्यांची सूर्यफूल शेती पाहायला अनेक शेतकरी, पर्यटक येत आहेत.
एक लाखाचे उत्पन्न
सूर्यफूल शेती ही अतिशय कमी खर्चाची, कमी मेहनतीची व कमी पाण्याची आहे. एकरी साधारणपणे दीड किलो बियाणे लागते. एकरी साधारणपणे पंधरा हजार खर्च येतो. एक एकरमधून आठ ते नऊ क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होते. जर सूर्यफुलाचे लाकडी घाण्यावर गाळप केल्यास एका क्विंटलला साधारणपणे पस्तीस ते चाळीस लिटर सेंद्रिय व शुद्ध तेल मिळते. सर्व खर्च वजा जाऊन एकरी एक लाख दहा हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते असे गुरुनाथ सांबरे यांनी सांगितले.

























































