
ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचार्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या पतसंस्थेने फसवणूक केलेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले आहे.
श्रीरामपूर शाखेतील ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बीड या पतसंस्थेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, शाखा मॅनेजर, कर्मचारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅशियर यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात २९ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बीड, शाखा श्रीरामपूर व नेवासा या शाखांचे आरोपी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, शाखा मॅनेजर, कर्मचारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅशियर यांनी आकर्षक व्याजदरांची जाहिरात करून, गुंतवणूकदारांचे श्रीरामपूर शाखेत बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव योजना, आरडी खाते इत्यादी योजनांमध्ये ठेवीदारांना खाते उघडण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीची मुदत संपल्यानंतरदेखील त्यांना ठेवी परत मिळाल्या नाहीत, अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह गुन्ह्याच्या तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले आहे.



























































