
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेची मशाल धगधगली. या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) खुस्पे यांनी इतिहास घडवला. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या 30 वर्षांच्या मक्तेदारीला खुस्पे यांनी सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खुस्पे हे जायंट किलर ठरले.
शिंदे गटाचे अशोक वैती गेल्या 30 वर्षांपासून या प्रभागातून निवडून येत होते. तर शिवसेनेने शहाजी खुस्पे या नवख्या उमेदवाराला त्यांच्यासमोर तिकीट दिले. खुस्पे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीने अवघा मतदारसंघ ढवळून काढला. शिंदे यांच्या दारातच असलेल्या या मतदारसंघात मतदारांनी खुस्पे यांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांना 12 हजार 860 मते मिळाली तर पराभूत झालेल्या वैती यांना 12 हजार 193 मते मिळाली. वैतींच्या पराभवामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
संधीचे सोने करून दाखवेन
माजी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रभागाची दुर्दशा झाली आहे. आता मतदारांनी संधी दिली असून या संधीचे सोने करून दाखवेन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व आणि शिवसेना नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास करून कायापालट करून दाखवेन अशी ग्वाही शहाजी खुस्पे यांनी दिली.




























































