
सोशल मीडियावर सध्या एका 22 सेकंदांच्या हृदयद्रावक व्हिडिओने सर्वांना हेलावून सोडले आहे. गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा हे गेल्या 13 वर्षांपासून ‘व्हेजिटेटिव्ह स्टेट’मध्ये (नॉन-रिस्पॉन्सिव्ह) अंथरुणाला खिळलेले आहेत. रविवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात नेण्यापूर्वी कुटुंबाने त्यांचा निरोप घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला हरीश यांच्या डोक्यावरून हात फिरवत, “सगळ्यांना माफ कर आणि सर्वांची माफी मागून आता शांतपणे जा,” असे सांगताना दिसत आहे. त्यांच्या डोळ्यांतील ती शांतता आणि कुटुंबाचे ते शब्द पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.
🚨Family said emotional goodbye Sunday morning before he was taken to AIIMS Delhi.
Harish Rana was in vegetative state since 2013 accident. Supreme Court approved India’s first passive euthanasia on March 11, 2026. pic.twitter.com/PbckY8Jvgc
— The Tatva (@thetatvaindia) March 15, 2026
हरीश राणा यांचा 2013 मध्ये एका भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज सुरू झाली होती. तेव्हापासून ते कोमात असून त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यांच्या प्रदीर्घ वेदना पाहता, त्यांच्या कुटुंबाने न्यायालयात इच्छामृत्यूसाठी धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना, ११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा यांना ‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रिय इच्छामृत्यू) देण्यास परवानगी दिली. हिंदुस्थानात अशा प्रकारे कायदेशीररीत्या इच्छामृत्यूची प्रक्रिया पार पडण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर, हरीश यांना एम्स, दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची ‘पेन मॅनेजमेंट’ आणि टप्प्याटप्प्याने लाइफ सपोर्ट सिस्टम हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

























































