
‘महाराष्ट्र केसरी’च्या आखाडय़ात दुसऱया फेरीत हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या माजी ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या मल्लांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत अपेक्षेप्रमाणे आगेकूच केली. जणू पाचही पुन्हा जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून आखाडय़ात उतरल्याचे चित्र उभे राहिले.
गादी विभाग दिग्गजांचा दबदबा
आजचा दिवस माजी ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यांचाच होता. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने धाराशीवच्या धीरज बारस्करला 12-2 ने धूळ चारत दमदार सुरुवात केली. तर नांदेडच्या शिवराज राक्षेने पुणे शहराच्या श्रेयस होळकरचा 10-0 ने धुव्वा उडवत आपली आक्रमकता सिद्ध केली.
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलही कुठेच कमी पडला नाही. त्याने सांगलीच्या सत्पाल शिंदेला 10-0 ने नामोहरम करत दादागिरी कायम ठेवली. नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने अमरावतीच्या वेताळ शेळकेवर 8-1 अशी मात करत आपले पाऊल जेतेपदाच्या दिशेने टाकले.
सिकंदरचा जखमी अवस्थेतही ‘धडाका’!
हिंगोलीच्या स्टार कुस्तीपटू सिपंदर शेखने लढतीदरम्यान नाकाला दुखापत होऊनही हार मानली नाही. उलट जखमेवर मात करत पुण्याच्या मनीष रायतेवर 8-2 ने बाजी मारत ‘मी अजून जिवंत आहे!’ असा इशारा प्रतिस्पर्धी मल्लांना दिला. त्याच्या जिद्दीला प्रेक्षकांनी उभे राहून सलाम ठोकला. शेखचा झुंजार खेळ पाहून तोच केसरीचा ‘सिपंदर’ होणार, असे संकेत मिळाले.
‘महाराष्ट्र केसरी’च्या आखाडय़ात अनाथ लेकरांचा जल्लोष!
वाघोलीतील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवत अक्षरशः आखाडा दणाणून सोडला. मात्र हा फक्त खेळाचा आनंद नव्हता. ही होती आयुष्याशी दोन हात करणाऱया लेकरांची जिद्दीची गर्जना!
या शाळेत आत्महत्या केलेल्या शेतकऱयांची लेकरं, तर कोविडच्या काळात आई-वडिलांना गमावून अनाथ झालेली मुलं शिक्षण घेत आहेत. आयुष्याने लहान वयातच कठोर परीक्षा घेतलेल्या या चिमुकल्यांसाठी आजचा दिवस मात्र संस्मरणीय ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’सारखी भव्य, दर्जेदार कुस्ती स्पर्धा त्यांनी प्रथमच पाहिली आणि त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य, उत्साह आणि स्वप्नांची ठिणगी एकाच वेळी पेटलेली दिसत होती.
आखाडय़ातील प्रत्येक चुरशीची झुंज, डाव-प्रतिडाव आणि मल्लांमधील जय-पराजय बघताना या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. क्षणभरासाठी का होईना, पण दुःखाचे सावट दूर सारून या लेकरांनी आनंदाचा उत्सव साजरा केला.

























































