
कुस्तीप्रेमींचा उसळलेला जनसागर… एकाच तालमीतील दोन जीवाभावाच्या दोस्तांमध्येच रंगलेली लढत… एकाच गुरूचे दोन चेले असल्यामुळे निश्चिंत बसलेले वस्ताद… अशा फारसा खुन्नस का मामला नसलेल्या किताबी लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला 4-3 गुणफरकाने पराभूत करत 68व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानाची चांदीची गदा जिंकली. आता तो यापुढे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ म्हणून मिरवणार आहे. कारण हर्षवर्धनने याआधी 2019 साली पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावली होती. आता ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होताच हर्षवर्धनच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. त्याला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दुसऱयांदा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताबावर समाधान मानावे लागलेल्या महेंद्र गायकवाडला स्कॉर्पिओs गाडी व रोख चार लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
दोस्तीतली झुंज पण डाव हर्षवर्धनचा
हर्षवर्धन सदगीर व महेंद्र गायकवाड हे दोघेही मल्ल ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाडय़ात सराव करत असल्याने दोघांनाही एकमेकांचा खेळ चांगलाच माहिती होता. सायंकाळी बरोबर 8 वाजून 43 मिनिटांच्या ठोक्याला ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची सलामी झडली. गादी विभागातील काटक व चपळ हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील ‘बाहुबली’ नावाने ओळखला जाणारा महेंद्र गायकवाड यांच्यात चौदंडी सुरू झाली, मात्र महेंद्रने आपल्या ताकदीच्या जोरावर हर्षवर्धनला झोनच्या बाहेर ढकलून एका गुणाची कमाई केली. त्यानंतर लगेचच महेंद्रने हर्षवर्धनच्या दुहेरी पटात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र हर्षवर्धनने गर्दनखेच लावून महेंद्रचा डाव उधळून लावला. त्यानंतर बराच वेळ नकारात्मक कुस्ती झाली. दरम्यान हर्षवर्धननेही गुण मिळवित लढतीत 1-1 अशी बरोबरी साधली.
तीन मिनिटांची पहिली फेरी या बरोबरीतच संपली. दुसऱया फेरीला सुरुवात होताच महेंद्रने पुन्हा हर्षवर्धनच्या पटात घुसण्याचा प्रयत्न केला, पण हर्षवर्धनने तो डाव धुडकावला. मग निष्क्रिय कुस्तीमुळे महेंद्रला 30 सेपंदाचा ऑक्टिव्हिटी पीरियड देण्यात आला. या वेळेत गुण मिळविण्यात अपयशी ठरल्याने हर्षवर्धनला एक गुण बहाल करण्यात आला. हर्षवर्धन 2-1 असा आडीवर असताना शेवटचा 45 सेपंदांचा खेळ शिल्लक होता. तितक्यात हर्षवर्धनने पाठीवर ताबा घेत महत्त्वपूर्ण 2 गुणांची कमाई केली. तो 4-1 असा आघाडीवर गेल्याने महेंद्रचा ताबा सुटला व त्याने हर्षवर्धनच्या डोक्यात चापट मारली. पंचांनी ताकीद देत पुन्हा कुस्ती सुरू केली. उरलेल्या काही सेपंदांत महेंद्रने 2 गुण मिळविले, पण 3-4 असे पिछाडीवर राहिल्याने त्याचे ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
वाघोलीतील अजितदादा क्रीडानगरीत नेटक्या व देखण्या नियोजनात ‘68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची रविवारी सांगता झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मातीतल्या अंतिम लढतीत महेंद्रच बाहुबली
माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूर जिह्याच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिपंदर शेखवर 3-0 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच अटीतटीची, तुल्यबळ आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही लढत ठरली. ‘बाहुबली’ अशी ओळख असलेल्या महेंद्रने आक्रमक खेळाची सुरुवात करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. अनेक मैदानं गाजवलेल्या या दोन्ही दावेदारांमधील सामना कुस्तीशौकिनांसाठी उत्पंठा शिगेला पोहोचवणारा ठरला.
गादी विभागातील अंतिम फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासूनच खेमीची पकड घेत गुण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱया हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा 10-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्याच्या अनुभवसंपन्न आणि अचूक खेळामुळे गादी विभागातील ही लढत एकतर्फी झाली.























































