हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा, फडणवीसांनी माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला! काँग्रेसची टीका

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून तसा नवा जीआर काढण्यात आला आहे. फडणवीस-मिंधे सरकारची हिंदी लादण्याची चालबाजी समोर आल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही ट्विट करत फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस यांनी माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार. इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट घालण्यात आली आहे. म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट आहे. हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते, असेही सपकाळ म्हणाले.

तिसऱ्या भाषेच्या नावाखाली ‘हिंदी’ लादण्याचा कट; नवीन जीआरमधून फडणवीस-मिंध्यांची चालबाजी उघड

वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखाते असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे. अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय ? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा “एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती” चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.