हवाईमधील किलाऊआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक; 200 मीटरपर्यंत लाव्हा उसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील अत्यंत सक्रिय ज्वालामुखींपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हवाई बेटावरील ‘किलाऊआ’ ज्वालामुखी पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. गुरुवारी सकाळी अचानक झालेल्या या उद्रेकामुळे 200 मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत लाव्हाचे कारंजे हवेत उडाले. निसर्गाचे हे रौद्ररूप पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी तातडीने बंद करण्यात आले आहे.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला. लाइव्हस्ट्रीम कॅमेऱ्यात धुराचे प्रचंड लोट आणि डोंगरउतारावरून वेगाने वाहणारा लाव्हा स्पष्टपणे दिसून आला. आतापर्यंत या उद्रेकातून अंदाजे 36 लाख घन यार्ड लाव्हा बाहेर पडला असून परिसरात उष्णतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या या उद्यानात दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक भेट देतात. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे प्रशासनाने पर्यटकांना कडक सूचना जारी केल्या आहेत. हवेत उडणारी राख आणि ‘टेफ्रा’पासून (ज्वालामुखीचे अवशेष) स्वतःचा बचाव करण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे आणि गॉगल्स वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवेतील या सूक्ष्म कणांमुळे डोळ्यांना आणि श्वसनविकाराचा त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, शिखराच्या परिसरात फुटबॉलच्या आकाराचे मोठे तप्त गोळेही पडू शकतात.

किलाऊआ ज्वालामुखीचा इतिहास पाहता, 1952 पासून येथे अनेकदा मोठे उद्रेक झाले आहेत. यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या उद्रेकाने मोठी हानी केली होती, ज्यात अनेक घरे लाव्हाखाली गाडली गेली होती. 2007 पासूनच ज्वालामुखीजवळील काही भाग भूस्खलन आणि जमिनीला तडे जाण्याच्या धोक्यामुळे लोकांसाठी कायमचा बंद ठेवण्यात आला आहे.