
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वेच्च न्यायालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र का करू नये, असा सवाल करीत त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे मिंधे गटाचेही चांगलेच धाबे दणाणले असून त्यांचे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गद्दारी केलेल्या मिंधे गट व अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वेच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. खंडपीठाने गेल्या आठवडय़ात अजित पवार गटाच्या 41 आमदारांना नोटीस बजावली होती. त्याचवेळी नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर अंतिम सुनावणी घेण्यास खंडपीठाने तयारी दाखवली होती. त्यामुळे मिंधे गटाच्या आमदारांबाबत मंगळवारच्या सुनावणीवेळी न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
n शिवसेनेतर्फे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांची सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यामुळे सुनावणी लक्षवेधी ठरली आहे.