
हिंगोलीत शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवारात गुडघ्या एवढे पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर धरणाच्या वरील बाजूस पाण्याची आवक वाढल्याने इसापूर येलदरी सिद्धेश्वर या धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला तर शनिवारी पहाटे जिल्ह्यातील 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मागील दोन दिवस पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेत शिवारात पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर वसमत कळमनुरी हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये नदी, नाले ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे अनेकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागले. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्याची नासाडी झाली आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाचे एकूण 15 दरवाजांपैकी 13 दरवाजे 0.50 मीटरने उघडलेले आहे. त्यातून 22062 क्युसेक्स विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर प्रकल्पाच्या 14 मुख्यद्वारातून 25638 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरु आहे. तसेच येलदरी प्रकल्प सांडव्याच्या 10 मुख्यद्वारांमधून 29480व विद्युत निर्मिती केंद्रातून 2700 असा 32180 क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरू आहे. तिन्ही धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.