
मागील काही दिवसांपासून संततधार कोसळणार्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भर म्हणून आज (06 ऑक्टोबर 2025) पहाटे पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावत जिल्हा आणि शहरात अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारनंतर काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शहरातील स्टेशन रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात गुडगाभर पाणी साचल्यामुळे आज सोमवारी कामकाजाच्या दिवशी व्यत्यय आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
अल्पावधीतच मुसळधार पावसामुळे शहरातील खानापूर फाटा, वसमत रोड, वांगी रोड, गंगाखेड रोड, जिंतूर रोड आणि कॉलन्यांतर्गत सखल भागात पाणी साचून वाहतुकीला मोठा अडथळा झाला. रस्त्यांवर आणि परिसरात नदीसदृश प्रवाह निर्माण झाला, तर अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. पावसाचा जोर सकाळी थोडासा कमी झाला असला तरी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीतच राहिले. बाजारपेठा ओस पडल्या, शाळा आणि महाविद्यालयांची वाहतूक ठप्प झाली. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाल्यांमध्ये ओसंडून पाणी आल्याने खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांना स्वतःच्या ताकदीवर पाणी बाहेर काढावे लागले. परतीच्या या पावसामुळे शेतकर्यांची होती नव्हती ती पिकेही हातची गेली आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेला बळीराजा आता हतबल अवस्थेत आहे. प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, लवकरच पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.