रत्नागिरी जलमय; दिवाळीनंतर अवकाळीचा कहर

दिवाळीनंतर अवकाळी पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळपासून ढगांचा गडगडाट करत मुसळधार पावसाने रत्नागिरीत बरसायला सुरुवात केली. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

मंगळवारी दुपारनंतर पावसाने बरसायला सुरूवात केली. दोन-तीन तास संततधार पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडवली.रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे खणले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले. रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.एसटी स्टॅंड,राम आळी,गोखले नाका परिसर जलमय झाल्याने बाजारपेठा ठप्प झाल्या.

खड्डयाचे तलाव बनले
रत्नागिरी शहरात पाण्याची पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे.खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात हे खड्डे पाण्याने भरल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले.जलमय रस्त्यातून खड्ड्यांचा अंदाज घेत गाडी चालविण्याची कसरत अनेकांना करावी लागली.