मान्सूनने नऊ दिवस आधीच देश व्यापला; मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर पाच दिवस मुसळधार

यंदा 15 दिवस आधीच दाखल झालेला मान्सून संपूर्ण देशात चांगलाच सक्रिय झाला आहे. अवघ्या काही दिवसांत सर्व राज्यांत धडकलेल्या मान्सूनने नऊ दिवस आधीच देश व्यापला आहे. साधारणपणे 8 जुलैला मान्सून देश व्यापतो. यंदा मात्र संपूर्ण देशात सक्रिय होण्यातही मान्सूनने नवा विक्रम केला आहे. याचदरम्यान अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत देशाच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदा 24 मे रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मान्सून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिह्यात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनने इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली आणि अखेर रविवारी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. याचदरम्यान अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांत दमदार पाऊस पडत आहे. त्याचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट, काही भागांत अतिवृष्टी

हवामान खात्याने राज्याच्या काही भागांत अतिवृष्टी होणार असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्र या भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.