
जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूक ठप्प
लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: कहर केला असून अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक सेवा स्थगित करण्यात आली आहे. जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आली आहे.
जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी, माळहिप्परग, अतनूर याठिकाणच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. तिरुका येथील तिरु नदीचे पाणी पुलावरून वाहात आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अहमदपूर ते जळकोट तालुक्यातील केकत सिंदगी ही रस्ता वाहतूक बंद झाली आहे. तिरुका येथे जळकोट उदगीर महामार्ग वर पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मेवापूर ते अतनूर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी सुरू आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील वाहतूक ठप्प
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रमुख रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. हडोळती थोट सावरगाव पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतुक बंद झाली आहे . पुलावरून पाणी वाहत असल्याने वायगाव पाटी ते गादेवाडी वाहतूक रस्ता बंद करण्यात आली .शिरूर ताजबंद ते मुखेड राज्यमार्ग वळसंगी येथील पुलावरून पाणी वाहत असल्या मुळे दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली आहे. शिरूर ते हाडोळती जाणारे रोडवर वळसंगी येथील पुलावरून पाणी वाहत आहे मुखेड ते शिरूर ताजबंद वाहतूक बंद आहे. पुलाजवळील उत्तरेकडील पश्चिम बाजूचा रस्ता खचत आहे.
हाळी ते खरबवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असून वाहतूकीसाठी दुसरा पर्याय मार्ग नाही. कोळवाडी ते किनगाव रस्त्यावरून पाणी वाहत आहे ..ह्या रस्त्यांनी वाहतूक बंद आहे .पण पर्यायी रस्ता हिंगणगावहून चालू आहे. सिदंगी खु येथील पुलावरून पाणी जात आहे. गावाचा संपर्कासाठी पर्यायी मार्ग बंद आहे. अहमदपूर तालुक्यातील मोघा येथील पुलावरुन पाणी जात आहे त्यामुळे मोघा _अहमदपूर रस्ता बंद करण्यात आला आहे. शिरूर ते आंबेगाव हा रस्ताही बंद आहे पुलावर पाणी आलेलं आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. काळेगाव च्या पुलावरून पाणी जात आहे.
अहमदपूर काळेगाव ते पुढे खंडाळी जाणारा रस्ता बंद.
अहमदपूर तालुक्यातील चिलका येथे बंधाऱ्याजवळ मन्याड नदीच्या पुरामध्ये शेडवर असलेले तीन मजूर अडकले होते. त्यामुळे तेथे त्वरित मदतीची गरज होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची रेस्क्यू टीम घटनास्थळाजवळ पोहचली आहे. किनगाव – अहमदपूर रोड वरील कोपरा गावालगत वाहणारी मन्याड नदीला पूर ओसंडून वाहत असून नदीकाठच्या घरांसह कोपरा गावाला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व बस सेवा थांबविण्यात आली आहे.
निलंगातील मठाच्या राम मंदिराची भिंत कोसळली
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान लातूर मधील निलंगा येथे महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठातील श्री राम मंदिर मंदिराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
श्री स्वामी समर्थ मठ हा समर्थ सांप्रदायाचा साधारणपणे 1650 च्या दरम्यान स्थापन झालेला मठ आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामी हे निलंगा येथे आले होते व त्यांनी 32 शिराळा येथील त्यांचे शिष्य आनंद स्वामी यांची या मठाचे मठपती म्हणून नेमणूक केली होती.
कालौघात या मंदिरात जुन्या बांधकामाची बरेचदा दुरुस्ती झालेली असणार. मात्र अता सतत चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे राममंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील पाठीमागची म्हणजेच पश्चिमेची भींतीचा भाग कोसळला आहे.
रोहिणा गावाचा संपर्क तुटला
चाकूर तालुक्यातील मौजे रोहिणा हे गाव अंबिका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते पण पावसामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे.
उजळंब ते रोहिना जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे तसेच रोहिना गाव ते अंबिका देवी मंदिर तालुका चाकुर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. औसा तालुक्यातील मौजे आशिव – आशिव तांडा पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी पात्रात 22621 क्यूसेक्स विसर्ग सुरू
माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा आवक लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने 27 सप्टेंबर रोजी ठीक 9:45 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 12 द्वारे हे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.तसेच तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढ करण्यात आला आहे.
सद्यःस्थितीत एकूण 12 वक्रद्वारे 50 सेंटिमीटरने चालू असून एकूण 22621 क्यूसेक्स (640.59) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.