
मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातल्या धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा 78.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोकणातील धरणे सर्वाधिक म्हणजे 88 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. राज्यात लहानमोठी आणि मध्यम अशी सुमारे तीन हजार धरणे आहेत. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणातील पाणीसाठा 68.33 टक्के होता. पण आताच्या पावसात धरणातील पाणीसाठा 78.36 टक्क्यांवर गेला आहे.
वीजनिर्मितीची चिंता मिटणार
महाराष्ट्राची वीज निर्मिती प्रामुख्याने साताऱ्यातील कोयना धरणावर अवलंबून असते. कोयना धरणातील पाणीसाठा 90.35 टक्क्यांवर गेला आहे. पुढील काही दिवसांत पाणीसाठय़ात आखणीन वाढ होईल. त्यामुळे वीज निर्मितीची यंदा चिंता मिटणार आहे, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात.
महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा
पैठण जायकवाडी – 94.45 टक्के, भंडारदरा – 90.58 टक्के, नाशिक गंगापूर – 84.15 टक्के, कोल्हापूर राधानगरी – 90.58 टक्के, पुणे नीरा देवघर – 98.54 टक्के, पानशेत – 92.75 टक्के, मुळशी टाटा – 95.19 टक्के, कोयना – 90.35 टक्के, सिंधुदुर्ग तिलारी – 87. 60 टक्के, ठाणे बारवी 100 टक्के
धरणे आणि पाणीसाठा
नागपूर – 67.08 टक्के, अमरावती – 74.36 टक्के, छत्रपती संभाजीनगर – 70.39 टक्के, नाशिक – 70.48 टक्के, पुणे – 78.17 टक्के, कोकण – 88.64 टक्के
n मे महिन्यात सर्वदूर सातत्याने पावसाने मुसळधार ते अतिमुसळधार तर जूनच्या पहिल्या आठवडय़ात मुसळधार हजेरी लावली. जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसाची बँटिंग जोरात सुरू होती.
कोयना धरणाचे दरवाजे उघडले
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी सायंकाळी 4 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुटापर्यंत उघडून 19,200 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एपूण 21,300 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्पतेचा इशारा देण्यात येत आहे.
अकोल्यात गावांचा संपर्क तुटला
अकोला जिह्यातील पातुर व मूर्तिजापूर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. पातूर तालुक्यातल्या निर्गुणा नदीला देखील पूर आला असून निर्गुणा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. तर आलेगाव इथल्या पुलावरून जवळपास 4 ते 5 फूट पुराचे पाणी वाहत असल्याने 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. जिह्यातील पातुर आणि मुर्तीजापुर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच तडाखा दिला. पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.