
अवघ्या दोन तासांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुणे शहर पाण्यात गेले. सिंहगड रस्त्यावर नवश्या मारुती मंदिराच्या शेजारी फुले विक्रसाठी बसलेल्या महिलेच्या अंगावर झोड कोसळल्याने मृत्यू झाला. शहरात 82 ठिकाणी झाडे पडली. रस्ते तुंबले, वाहतूक ठप्प झाली, वीज गायब झाली. मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले. धुव्वाधार पावसाने रस्त्यांना जणू ओढय़ांचे स्वरूप आले. पेठांमधील दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले. पथारीवाल्यांची दैना झाली. दरम्यान, पुणे शहर स्मार्ट सिटी बनवत असल्याचा दावा वारंवार सरकार आणि महापालिकेकडून केला जातो. मात्र, अवकाळी पावसातच या ‘स्मार्ट सिटी’चे अक्षरशः तीनतेरा वाजले.
धुव्वाधार पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक ठिकाणी कार व दुचाकी अक्षरशŠ पावसाच्या पाण्यात बुडलेल्या पहायला मिळाल्या. आजच्या पावसाने 130 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. गुरुवारी शहराच्या अनेक भागांत 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस कोसळला.
झाड कोसळून फुल विक्रेत्या महिलेचा मृत्यू
वादळी वारे आणि मुसळधार पावसात झाड कोसळून फुल विक्री करणाऱया महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. रंजना नवनाथ गिरी (60) असे मृत महिलेचे नाव आहे. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी मंदिरामागील गल्लीत एक मोठे झाड त्यांच्या टपरीवर कोसळले. झाडाखाली त्या अडकून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.






























































