गायमुख घाटात अवजड वाहनांची ‘घुसखोरी’; बंदी झुगारणाऱ्या 250 चालकांना दंड

गायमुख घाटातील एक मार्गिका सध्या बंद आहे. त्यामुळे वसई-विरार मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना ठाण्यात बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील ट्रेलर, डंपर, कंटेनर, मोठे ट्रक बिनधास्तपणे राँग साईड मारून ठाण्यात एण्ट्री करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली असून 250 जणांना दंड ठोठावला आहे. गेल्या 24 तासांत साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर 35 जणांवर गुन्हेदेखील दाखल झाले असून यापुढेही अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे.

गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू केले आहे. हे काम 29 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत ठाणे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. अवजड वाहनांना बंदी केली असली तरी भाईंदर व वसई-विरारमार्गे बिनधास्तपणे ही वाहने ठाण्यात प्रवेश करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याची गंभीर दखल ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतली असून अशा बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

कोंडी दूर करताना तारेवरची कसरत
घोडबंदर, नाशिक, मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये याचे नियोजन ठाणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. गुजरातहून येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे आणि मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदर मार्गाने येणारे जड-अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद केला असतानादेखील या कामात अडथळा आणला जात आहे. ही कोंडी दूर करताना ठाणे वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणाचा घाट कामाला आणि ठाणे वाहतूक पोलिसांना फटका बसत आहे. जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असूनही ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या कोंडीने ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शनिवारी अनेक वाहने घाटात अडकली असल्याने सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होती. ठाण्याकडे येणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्याने घाटावरील कामात अडथळे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाईंदर आणि वसई-विरार वाहतूक पोलिसांना वाहने न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– पंकज शिरसाट (पोलीस उपायुक्त ठाणे वाहतूक)