श्री सिद्धिविनायकसह शिर्डीचे साईमंदिर ‘अलर्ट मोड’वर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ, सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर लक्ष

हिंदुस्थान आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरासह शिर्डीच्या साईबाबा मंदिर, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अशा राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव उद्या, रविवारपासून श्री सिद्धिविनायक आणि साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद नेण्यास बंदी घातली, मात्र दर्शनासाठी येताना भाविक दूर्वांची जुडी आणि जास्वंदीचे फूल नेऊ शकतात, अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे देण्यात आली.

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. संवेदनशील भागांत पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला दररोज देशभरातून हजारो भाविक भेट देतात. साईबाबा मंदिर उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर या मंदिराची सुरक्षा वाढवली आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळेपर्यंत मंदिरात उद्यापासून हार- फुले, प्रसाद आणि मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवारी या मंदिराला भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. साईबाबा मंदिरात सुरक्षारक्षक, पोलीस आणि विविध सुरक्षा एजन्सीचे तब्बल एक हजाराहून अधिक सुरक्षारक्षक तैनात आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेत वाढ
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. भाविकांची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिराच्या व्हीआयपी गेटसमोर पोलीस तैनात आहेत. संत नामदेव पायरी, दर्शनबारी आणि मंदिरात देखील पोलिसांची सुरक्षा वाढवली आहे. बॉम्बशोधक पथकाकडून मंदिराची दिवसभरातून दोनवेळा तपासणी केली जात आहे. भाविकांच्या वस्तू आणि बॅगचे स्पॅनिंग केले जात आहे.

जवानांच्या सुरक्षेसाठी श्री अंबाबाईला साकडे
युद्धजन्य परिस्थितीत दहशतवाद्यांचा खात्मा व्हावा आणि हिंदुस्थानच्या सीमेचे रक्षण करणाऱया जवानांच्या सुरक्षेसाठी हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी साकडे घालण्यात आले. यथाशक्ती पूजनाचा आणि विशिष्ट श्लोकांच्या जपाचा विधिवत संकल्प करून, मातृभूमीचे रक्षण करणाऱया हिंदुस्थानी जवानांच्या सुरक्षिततेसाठी आई अंबाबाईला साकडे घालण्यात आले.