डोंबिवलीच्या सावित्री सोसायटीत सन्नाटा, हेमंत जोशी यांच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कर्मकहाणी सांगताना मेहुणे मोहीत भावे यांना अश्रू अनावर

माझा भाचा ध्रुवची दहावीची परीक्षा आटोपली म्हणून त्याला कश्मीर दाखवण्यासाठी भावोजी हेमंत जोशी आणि माझी बहीण मोनिका तिथे गेले. बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांना जात आणि धर्म विचारला. हेमंत जोशी यांनी हिंदू असल्याचे सांगताच त्यांच्यावर एके47 रायफलीतून छातीत आणि डोक्यात गोळ्या झाडल्या. ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. माझी बहीण आणि भाच्याने आकांत केला पण काहीही उपयोग नव्हता. हेमंत जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा थरार त्यांचे मेहुणे मोहीत भावे यांनी सांगितला तेव्हा उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. जोशी राहत असलेल्या डोंबिवलीच्या सावित्री सोसायटीत मंगळवार संध्याकाळपासून सन्नाटा पसरला आहे.

हेमंत जोशी हे एका नामांकित लॉजिस्टीक कंपनीत मार्केटिंग विभागात कार्यरत होते. त्यांची पत्नी मोनिका या एका खासगी कंपनीत नोकरी करतात. मुलगा ध्रुवची दहावीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर आपण कश्मीरला फिरून येऊ असे हेमंत जोशी यांनी ध्रुवला कबूल केले. त्यानुसार जोशी कुटुंब कश्मीरला फिरायला गेले.

‘ते’ आता परत कधीच येणार नाहीत

सावित्री सोसायटीतील रहिवाशांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे. हेमंत जोशी हे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून दहा-बारा वर्षे कार्यरत होते. मनमिळाऊ, संयमी आणि मदतीस तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व होते. कश्मीरला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सोसायटीतील सर्व सदस्यांची भेट घेतली. पण आता ते कधीही परत येणार नाहीत असे सांगताना सोसायटीतील रहिवाशांचे डोळे पाणावले होते.

क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला

‘ते’ बोलणे अखेरचे ठरले

हल्ल्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी 7.30 ला भावोजींनी मला फोन करून कश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन केले. काही फोटोही पाठवले. पण आमचा हा संवाद अखेरचा असेल याची क्षणभरही कल्पना आली नाही, असे मोहीत भावे यांनी सानुनयनांनी सांगितले.

पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले

ठाण्यातील 34 पर्यटक सुरक्षित

ठाण्यातील 34 पर्यटक सुरक्षित असल्याचे पत्रक जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. भूषण गोळे (39), ज्योती गोळे (36), आरव गोळे (8), विनोद गोळे (41), माधुरी गोळे (41), विहान गोळे (11), स्वाती गोळे (36) हे श्रीनगर येथील सफायर हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. अतुल सोनावणे (42), प्रियंका सोनावणे (34), अनन्या सोनावणे (12), प्रणव सोनावणे (8) हे श्रीनगरच्या हेरिटेज हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. नंदकुमार म्हात्रे (65), नीलिमा म्हात्रे (65), निशांक म्हात्रे (31), प्रमदा पाटील (30), सुजन पाटील (63), आशा पाटील (60), नेहा ठाकूर (35), मनोज ठाकूर (39), विहान ठाकूर (7), संजय म्हात्रे (58), स्वाती म्हात्रे (49) हे श्रीनगर राजबाग येथील करम गोल्ड हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. नेत्रा पांगरकर (37), भूषण पांगरकर (40), इंद्रायणी पांगरकर (65), श्लोक पांगरकर (12) आणि विहान ढोलम (5) हे श्रीनगरच्या लंकार हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. गौरव सांगळे (37), दीपाली सांगळे (35), स्वाती सांगळे (40), वेद सांगळे (7) आणि क्षुभ क्षीरसागर (10) हे श्रीनगरच्या हॉटेल टू होम स्टे येथे सुरक्षित आहेत. तर मनाली ठाकूर (28) आणि प्रणय ठाकूर (29) हे श्रीनगरच्या क्राऊन प्लाझा रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अर्ध्या रस्त्यातून परतलो आणि आमचा जीव वाचला..

पहलगामच्या बैसरन व्हॅलीपासून आम्ही जेमतेम फक्त एक किलोमीटर अंतरावर होतो. पायवाट अतिशय निसरडी होती. घोड्याचे पाय वारंवार घसरत होते. कारण निमुळता रस्ता आणि चिखल.. या खडतर पायवाटेने जाताना आम्हा दोघांच्या पायाला जखमा झाल्या. घोड्याचे पायही रक्ताळले होते. या कठीण परिस्थितीमुळे अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. घोडेस्वाराला त्याचे दोन हजार रुपये दिले आणि आम्ही थेट हॉटेलवर पोहोचलो. त्यानंतर बैसरनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समजली. अर्ध्या रस्त्यातून माघारी परतल्यानेच आमचा जीव वाचला असे उरणमधील पर्यटक अशोक म्हात्रे व साधना म्हात्रे यांनी सांगितले. ‘तो’ थरारक प्रसंग सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

येथे संपर्क साधा

रायगड जिल्हा प्रशासनाने जम्मू कश्मीर येथील हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत यासंदर्भात 02141-222118, 222097तसेच 8275152363, 9763646326 हे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. अडचणीत आलेल्या पर्यटकांनी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय मदतीसाठी सज्ज असून जम्मू कश्मीरमध्ये थेट संपर्कासाठी काही नंबर प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये जम्मू कश्मीर प्रशासनाने जारी केलेल्या 0194- 2483651, 2457543 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 7780805144, 7780938397 या क्रमांकाचा समावेश आहे.